मध्य रेल्वेवर सोमवारपासून आणखी १२ एसी लोकल,साध्या लोकल घटल्याने गर्दी वाढणार

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील प्रवाशांच्या मागणीनुसार या वातानुकूलित फेऱ्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क विभागाने म्हटले आहे.

मध्य रेल्वेवर सोमवारपासून आणखी १२ एसी लोकल,साध्या लोकल घटल्याने गर्दी वाढणार
ac local news
| Updated on: Jun 27, 2026 | 11:17 PM

मध्य रेल्वेवर सोमवारपासून आणखीन १२ वातानुकूलित लोकल धावणार आहेत. साध्या कमी तिकीट दराच्या लोकलच्या बदल्यात या नव्या एसी लोकल चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे मूळ लोकलच्या फेऱ्यांची संख्या तेवढीच ( १८२० ) राहणार आहे. एसी लोकलचे तिकीट प्रचंड महाग असल्याने सामान्य लोकांना या लोकलने प्रवास करता येत नाही. त्यामुळे एसी लोकलच्या १२ फेऱ्यांच्या बदल्यात साध्या लोकल प्रवाशांच्या बोकांडी बसणार आहेत. यामुळे मध्य रेल्वेवर आधीच असणारी गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा अनुभव आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना येणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील साध्या १२ लोकलचे रुपांतर वातानुकूलित लोकल सेवेत होणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील एकूण वातानुकूलित फेऱ्यांची संख्या १२० इतकी होणार आहे. येत्या सोमवार, दि. २९ जून २०२६ पासून मेन लाईनवरील १२ विना-वातानुकूलित उपनगरीय फेऱ्यांचे वातानुकूलित सेवांमध्ये रूपांतर होणार आहे. मुख्य मार्गावरील प्रवाशांच्या मागणीनुसार या वातानुकूलित फेऱ्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे. सध्याच्या विना-वातानुकूलित लोकल फेऱ्यांच्या जागी या फेऱ्या सुरु केल्या जात असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

या बदलामुळे मध्य रेल्वेवरील एकूण वातानुकूलित उपनगरीय फेऱ्यांची संख्या आता १२० पर्यंत वाढणार आहे. यामध्ये हार्बर लाईनवरील २८ आणि मेन लाईनवरील ९२ फेऱ्यांचा समावेश असणार आहे. या वातानुकूलित लोकल फेऱ्या सोमवार ते शनिवार या कालावधीत चालवल्या जातील. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार मेन लाईनवर धावणाऱ्या एसी लोकलची एकूण संख्या ८० वरून ९२ पर्यंत वाढणार आहे. हार्बर लाईनवर धावणाऱ्या एसी लोकलची एकूण संख्या २८ आहे.

आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांत ( सोमवार ते शुक्रवार ) मुंबई विभागातील मेन लाईन आणि हार्बर लाईनवर चालणाऱ्या एकूण उपनगरीय एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता १२० पर्यंत वाढणार आहे. आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांत मध्य रेल्वे मुंबई डिव्हीजन (सर्व लाईन्सवर) चालणाऱ्या एकूण उपनगरीय लोकल फेऱ्यांची संख्या तेवढीच म्हणजेच १८२० इतकी राहणार आहे.

Follow Us