
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मुंबईला जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. काल अंतरवाली सराटी येथून जरांगे पाटील शेकडो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. राज्यभराच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून मराठा बांधव हे थेट आता मुंबई गाठत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, एका मराठा आंदोलकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.
आंदोलकाचा शिवनेरीच्या पायथ्याशीच मृत्यू
मराठ्यांचे वादळ मुंबईच्या दिशेने धडकणार असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर जरांगे पाटील गेले होते. दरम्यान, किल्ल्याच्या पायथ्याशी एका 45 वर्षीय मराठा बांधवांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितलं. सतिष देशमुख असं मृत व्यक्तीचं नाव आहे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मृत व्यक्ती वरडगाव केज येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
वाचा: चलो मुंबई! जरांगे पाटील यांना सुरक्षा देणारी टीम तयार, आंतरवाली सराटीकडे रवाना
जरांगेंनी वाहिली श्रद्धांजली
काल, मनोज जरांगे पाटील हे जुन्नरमध्ये दाखल झाले होते. ठिक ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. जुन्नरमध्ये मुक्काम करुन जरांगे पाठील आज सकाळी किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यास गेले होते. तेथून निघतानाच पायथ्याशी एका आंदोलकाचा मृत्यू झाला. या आंदोकाला श्रद्धांजली वाहून आणि त्याच्या कुटुंबीयांचे सात्वन करून जरांगे पाटील आता मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर मागण्यासाठी मुबंई जात असताना अहिल्यानगर पोहतील आणि ते या ठिकाणी मराठा समाज बांधवशी संवाद साधतील.
आझाद मैदानावर मराठा बांधव
मुंबईच्या आझाद मैदानात हळूहळू आंदोलन येण्यास सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानामध्ये येताना दिसत आहे. मोर्चामधील गर्दी आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आझाद मैदानात जमलेल्या आंदोलकाकडून घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यातून आझाद मैदानात दाखल होत आहे. विशेष म्हणजे या मोर्चात ओबीसी आणि मुस्लिम बांधवांचा देखील समावेश आहे.