मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही ‘नाईट लाईफ’ सुरु होणार? आदित्य ठाकरे म्हणतात…

| Updated on: Jan 19, 2020 | 9:24 AM

आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील 'नाईट लाईफ' येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईत 24 तास हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु राहणार आहेत.

मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही नाईट लाईफ सुरु होणार? आदित्य ठाकरे म्हणतात...
Follow us on

पुणे : मुंबई पाठोपाठ पुण्यातही ‘नाईट लाईफ’ सुरु कराल का? असा प्रश्न पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना विचारला असता, “पुणेकरांकडून प्रस्ताव आला तर नक्कीच पुण्यातही नाईट लाईफ सुरु करण्यात येईल”, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘नाईट लाईफ’ येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईत 24 तास हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु राहणार आहेत.

पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सर्जा’ या खासगी रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) गेले होते. यावेळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी ‘नाईट लाईफ’ विषयी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“पुणेकरांकडून प्रस्ताव आला तर पुण्यातही ‘नाईट लाईफ’ सुरु करता येईल. मात्र, याबाबत आता कोणतेही आश्वासन देणार नाही. मुंबईत 24 तास सर्वासामन्य लोक काम करत असतात. रात्री भूक लागली तर जायचं कुठे? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे तिथे हा निर्णय घेण्यात आला”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

येत्या 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा या ठिकाणचे हॉटेल, पब, मॉल्स, थिएटर 24 तास खुले राहणार आहेत. हे सर्व सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येत आहे.

मुंबईत ‘नाईट लाईफ’ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. भाजप शिवसेना युती सरकारच्या वेळी आदित्य ठाकरेंनी ही संकल्पना मांडली होती. त्यावेळी याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र आता महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर प्रायोगिक तत्वावर यावर निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे आदित्य ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने हे पहिले पाऊल पडलं आहे. या निर्णयानंतर आता मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स 24 तास सुरु राहू शकतात. ज्यांची इच्छा असेल ते 24 तास व्यवसाय करु शकतात.