600 रुपयांच्या उधारीवरुन मजूर भिडले, एकमेकांवर Acid Attack, आठ जण होरपळले

एका प्लेटिंगच्या कारखान्यात मजूरांमध्ये किरकोळ कारणांनी भांडणे होऊन त्यांनी एकमेकांवर एसिड हल्ला केल्याने सात ते आठ जण होरपळले गेल्याची धक्कादायक घटना मालाड येथील प्रभाग क्रमांक 42, पालनगर भागात घडली आहे.

600 रुपयांच्या उधारीवरुन मजूर भिडले, एकमेकांवर  Acid Attack, आठ जण होरपळले
| Updated on: Apr 02, 2026 | 10:28 PM

मुंबईत मालाड उपनगरात एका विचित्र घटना घडली आहे. मालाड पूर्व स्थित प्रभाग क्रमांक 42, पालनगर भागात अनधिकृत प्लेटिंग कंपन्यात काम करणाऱ्या मजूरांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एकमेकांवर एसिडने हल्ला करण्याचा भयंकर प्रकार घडला आहे. या एसिड हल्ल्यात सहा ते सात पादचाऱ्यांनाही भाजल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहाशे रुपयांच्या उधारीवरुन हा वाद दोघा मजूरामध्ये झाल्याचे म्हटले जात आहे.

मालाड येथील पालनगर भागात अवैधपणे 100 ते 125 प्लेटिंग यूनिट्स स्थानीय नेते आणि प्रशासनाच्या कथित सहभागाने चालतात. यात धोकादायक एसिडचा सर्रासपणे वापर केला जात असतो. गुरुवारी कंपनीत काम करणाऱ्या मजुरांमध्ये सहाशे रुपयांच्या उधारीवरुन भांडणे सुरु झाली. जी पाहाता पाहाता मोठ्या हाणामारी पर्यंत पोहचली. यानंतर मजूरांनी एकमेकांवर एसिड फेकण्यास सुरुवात केली. हा भाग रस्त्याच्या कडेलाच असल्याने रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांवरही हे एसिड उडाले. त्यामुळे आठ जण होरपळले गेले.

या एसिड हल्ल्यात संदीप सरोज नावाचा तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अन्य सात जखमींवर महानगर पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत सुदैवाने कोणाचे प्राण गेले नाहीत.

पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

घटनेची माहिती कळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी येत परिस्थितीवर नियंत्रण आणले. पोलिसांनी समर बहादुर राजकुमार सिंह नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी या दोन्ही गटावर क्रॉस केस दाखल केली आहे. जे लोक या प्रकरणात रस्त्यावरुन जात होते. त्यांनाही आरोपी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांच्या तपासावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिक लोकांच्या माहितीनुसार येथे अनेक अवैध कंपन्या चालवल्या जात आहेत. या कंपन्यात एसिड सारखे घातक केमिकल सर्रास वापरले जात आहे. यात स्थानिक गुंड आणि नेत्याच्या आशीर्वाद असल्याचे म्हटले जात आहे.

Follow Us