सैन्य दलाच्या जवानांशी दुर्व्यवहार, आदित्य ठाकरेंच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्यावर कारवाई

| Updated on: Feb 19, 2020 | 8:46 PM

सैन्य दलाच्या बॅंड पथकातील जवानांसमवेत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी महाराष्ट्र सदनाच्या अधिकाऱ्यांना पदावरुन कार्यमुक्त करण्यात आलं आहे.

सैन्य दलाच्या जवानांशी दुर्व्यवहार, आदित्य ठाकरेंच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्यावर कारवाई
Follow us on

मुंबई : नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील उपहारगृहात सैन्य दलाच्या बॅंड पथकातील जवानांसमवेत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी सदनचे सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) विजय कायरकर यांना पदावरुन कार्यमुक्त करण्यात आलं आहे (Misbehaving with soldiers in Maharashtra Sadan). कायरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांची चौकशी करण्यासंदर्भात ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’च्या महासंचालकांना कळवण्यात आलं आहे. या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. यानंतर ही कारवाई झाली.

महाराष्ट्र सदन येथे आज (19 फेब्रुवारी) सकाळी शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सैन्य दलाच्या गोरखा रेजीमेंटचे बँड पथक छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर पथकातील जवान सदनच्या उपहारगृहातील एक्झीक्युटीव्ह डायनिंग हॉलमध्ये जेवणासाठी गेले. त्यावेळी सदनचे सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी जवानांना तिथे बसण्यास विरोध केला. जवानांना बाहेरच्या सार्वजनिक डायनिंग हॉलमध्ये बसण्यास सांगितले आणि त्यांच्याशी हुज्जत घातली. यावर कार्यक्रम आयोजकांनी आक्षेप घेतला आणि ते जवानांसह सदनाबाहेर पडले.


जवानांसोबत झालेल्या या दुर्व्यवहाराच्या प्रकरणाची माहिती मिळताच राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेऊन सदनचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा करुन माहिती घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी संबंधित सहायक निवासी आयुक्तावर तातडीने कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले. त्यानुसार महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्तांनी आदेश काढून कायरकर यांना सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) पदावरुन कार्यमुक्त केलं आहे.

जवानांशी केलेल्या दुर्व्यवहारप्रकरणी कायरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांची चौकशी करण्यासंदर्भात त्यांची मुळ आस्थापना असलेल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महासंचालकांना कळवण्यात आलं आहे. कायरकर हे महाराष्ट्र सदनला प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.

Misbehaving with soldiers in Maharashtra Sadan