
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार ते पाच दिवसांपासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांचा वाद चांगलाच रंगलेला बघायला मिळाला. हा वाद इतक्या टोकाला पोहचला होता की, दोन्ही नेते एकमेकांवर अक्षरश: खालच्या स्तरावर टीका करण्यापर्यंत पोहोचले होते. या वादादरम्यान बच्चू कडू यांनी सात ते आठ आमदारांसह राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा इशाराच दिला होता. अखेर या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याने दोन्ही आमदारांमधील वाद मिटला. पण ‘पिक्चर अभी बाकी है’ अशा सिनेमातील डायलॉग सारख्याच या संदर्भातील घडामोडी घडताना दिसत आहेत. कारण बच्चू कडू यांनी आज अमरावतीत केलेल्या शक्ती प्रदर्शनानंतर मुंबईत लगेच हालचालींना वेग आला आहे.
आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद मिटला असल्याचं चित्र असताना आज वेगळंच काहीतरी बघायला मिळालं. खरंतर ते होणार होतंच. बच्चू कडू यांनी याआधीच त्याची कल्पना दिलेली होती. अमरावतीत बच्चू कडू यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी त्यांनी रवी राणा यांचं नाव न घेता चांगलेच टोमणे लगावले.
“कोणी काय म्हटलं हा विषय महत्त्वाचा आहे. कारण अस्तित्वाचा आहे. कोणीही यावं आणि काहीही म्हणावं एवढे काय आम्ही स्वस्त नाहीये. पहिली वेळ आहे माफ आहे. आगे कुछ करेगा और कोईभी करेगा ना… मग प्रहारचा वार काय असतो हे तुम्हाला सांगू”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
बच्चू कडू यांच्या या इशाऱ्यानंतर मुंबईत घडामोडींना वेग आलाय. कारण बच्चू कडू यांच्या शक्ती प्रदर्शनानंतर मुंबईत आमदार रवी राणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी निघाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी ते बच्चू कडू यांनी दिलेल्या इशाऱ्यावर आणि शक्ती प्रदर्शनावर कदाचित फडणवीसांसोबत बोलू शकतात, असा अंदाज बांधला जातोय.
बच्चू कडू यांनी आज केलेल्या भाषणातील काही वक्तव्यांवर रवी राणा कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त करु शकतात. त्यानंतर देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात किंवा रवी राणा प्रसारमाध्यमांसमोर येऊन काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.