तुम्ही खरंच पुन्हा मुख्यमंत्री होणार का? थेट एकनाथ शिंदेंना प्रश्न; उत्तर काय आलं?
एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा दावा केला जात आहे. याच दाव्याबद्दल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी थेट शिंदे यांनाच प्रश्न केला आहे.

Eknath Shinde CM Post : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या नागपुरात विधिंमडळाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनातही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. या सर्व घडामोडी एकीकडे चालू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर बसणार असल्याचाही दावा अनेक नेते करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही तसा दावा केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानानंतर तर या चर्चेला अधिकच बळ मिळालेले आहे. दरम्यान, विधानपरिषदेच एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असतानाच हा विषय थट सभागृहात निघाला आहे. मुख्यमंत्रिपदाचा विषय निघाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या प्रतिक्रियेचीही चांगली चर्चा रंगली आहे.
आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार
एकनाथ शिंदे आज (14 डिसेंबर) विधानपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना तसेच विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी बोलताना शिंदे यांनी आम्ही लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. तसेच शेतकरी कर्जमाफी करण्याचा आम्ही जाहीरनाम्यात शब्द दिला आहे. हा शब्दही आम्ही पूर्ण करणार. तुम्ही समोर असतानाच आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, असेही शिंदे विरोधकांना उद्देशून म्हणाले. शेतकऱ्यांच्या नावावर काही लोक राजकारण करत आहेत. अतिवृष्टीच्या काळात काही लोक शेतकऱ्यांकडे जाऊन आले. आम्ही मात्र शेतकऱ्यांसोबत होतो, असे म्हणत तुम्ही शेतकऱ्यांकडे रिकामे हात घेऊन गेले, असा हल्लाोबल त्यांनी विरोधकांवर केला.
शशिकांत शिंदे यांची टोलेबाजी
एकनाथ शिंदे यांचे भाषण चालू असताना समोर विरोधी बाकावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बसलेले होते. शिंदे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाविषयी बोलत होते. याच वेळी शशिकांत शिंदे यांनी मला पत्रकार सांगत होते की एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत, हे खरे आहे का? असा प्रश्न शशिकांत शिंदे यांनी केला. शिंदे यांचे भाषण चालू असतानाच शशिकांत शिंदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांनी मात्र शशिकांत शिंदे यांच्या टोलेबाजीवर कोणतेही थेट उत्तर दिले नाही. आपले भाषण एकनाथ शिंदे यांनी चालूच ठेवले.
दरम्यान, शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार, याची चर्चा रंगल्याने आणि शशिकांत शिंदे यांनी केलेल्या टोलेबाजीवर शिंदे यांनी कोणतेही भाष्य न केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
