
राज्यात पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक गावात पुराचे पाणी शिरले. शेती तर पार खरडून गेली. काही गावातील नदीकाठच्या शेतात तर कंबरेपर्यंत पाणी शिरलं आहे. पावसाने यंदा हाहाकार उडवला आहे. शेतजमीन आणि पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी पंचनामे तातडीने करण्याची मागणी केली आहे. तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. आज कॅबिनेटची बैठक होत आहे. त्यापूर्वी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 70 लाख एकरवरील पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती कृषीमंत्री भरणे यांनी दिली आहे. तर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
70 लाख एकरवरील पिकांचं नुकसान
विदर्भात सर्वात मोठी अतिवृष्टी झाली. त्यानंतर आता मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा पावसाचा कहर झाल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. जवळजवळ 70 लाख एकरवरील पिकांचं नुकसान राज्यात झाल्याची माहिती भरणे यांनी दिली. नदीकाठची, ओढ्याकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जमीनच वाहून गेली आहे. पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पशूधनाचे मोठे नुकसान झालं आहे. गावात पाणी शिरले आहे. घराची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे या परिस्थितीवर नजर ठेऊन असल्याची माहिती भरणे यांनी दिली.
पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर
राज्यातील अतिवृष्टी पाहता पंचनामा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. शेवटी हे निसर्गाचं संकट आहे. आपल्या सर्वांना या संकटाला सामोरं जावंच लागेल. आपल्या सर्वांना धीर धरावा लागणार आहे. या संकटाच्या काळी, अडचणीच्यावेळी हे सरकार तुमच्या पाठीशी आहे. पंचनामा करण्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे. काही ठिकाणी झाले आहेत. तर काही ठिकाणी लागलीच सुरू होईल. ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले, त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले नाहीत. त्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल अशी घोषणा कृषीमंत्र्यांनी केली.
निकषानुसार मदत करणार
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना केंद्र आणि राज्य सरकारचे निकष तपासण्यात येतील. पण आता शेतकरी अडचणीत आहे. त्याला मदत मिळाली पाहिजे म्हणून आता मदतीवर भर देत असल्याचे कृषीमंत्री म्हणाले. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. हे सरकार शेतकऱ्यांना मदत करेल. त्यांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचे कृषीमंत्री म्हणाले. निकष असले तरी आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यापुढे जाऊन मदत करण्याचा प्रस्ताव आम्ही ठेऊ आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेनंतर काही तरी तोडगा निघेल. चांगला निर्णय होईल असा विश्वास दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.