‘मला ग्रेट भेटीचं साक्षीदार होता आलं’, राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर अमित ठाकरे यांची पोस्ट

राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या दिल्लीत झालेल्या भेटीवर अमित ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर मनसे आणि भाजप यांच्या युतीचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.

मला ग्रेट भेटीचं साक्षीदार होता आलं, राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर अमित ठाकरे यांची पोस्ट
| Updated on: Mar 19, 2024 | 5:14 PM

नवी दिल्ली | 19 मार्च 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा दिल्लीला गेले आहेत. राज ठाकरे काल (18 मार्च) संध्याकाळी मुंबई विमानतळावरुन दिल्लीच्या दिशेला रवाना झाले. ते काल रात्री 11 वाजेच्या सुमारास दिल्लीत पोहोचले. त्यानंतर आज सकाळी त्यांची दिल्लीत भाजप नेते विनोद तावडे यांच्यासोबत बैठक पार पडली. विनोद तावडे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे देखील उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे-भाजप युतीचे प्रयत्न दोन्ही बाजून केले जात आहेत. त्याचसाठी राज ठाकरे दिल्लीला गेल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे चार दिवसांपूर्वीदेखील दिल्लीला गेले होते. राज ठाकरे यांच्या आताच्या दिल्ली दौऱ्यात त्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडलीय. या बैठकीत मनसेला लोकसभेच्या किती जागा सोडल्या जातील, मनसेचं सत्तेत काय स्थान राहील? याबाबत चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

या सर्व घडामोडींदरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीचे फोटो पोस्ट करत भूमिका मांडली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मलाही या ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं, असं अमित ठाकरे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यानीदेखील अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. “आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ह्यांच्याशी दिल्लीत भेट झाली”, असं राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

मनसे-भाजप युती झाली तर कुणाला फायदा होणार?

मनसे-भाजप युती झाली तर दोन्ही पक्षांना त्याचा फायदा होणार आहे. महायुतीचं सध्या राज्यात सरकार आहे. त्यामुळे मनसेची भाजपसोबत युती झाली तर मनसेचा थेट सत्तेत सहभाग होणार आहे. मनसेचा सत्तेत सहभाग झाल्याने पक्षाला नव्याने उभारी येऊ शकते. कार्यकर्त्यांमध्ये नव्याने उभारी येऊ शकते. भाजप मनसेसाठी लोकसभेची दक्षिण मुंबईची जागा सोडायला तयार असल्याची माहिती मिळत आहेत. त्यामुळे मनसेचा पहिल्यांदाच खासदार निवडून येऊ शकतो. तसेच विधानसभेत मनसेची ज्या मतदारसंघांंमध्ये ताकद आहे त्या जागा महायुती सोडू शकते. त्यामुळे राज ठाकरे यांचा पक्ष आणखी बळकट होऊ शकतो.

या युतीचा भाजपलादेखील तितकाच फायदा होऊ शकतो. राज ठाकरे हे अत्यंत प्रभावशाली नेते आहेत. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी खूप मोठी गर्दी होते. राज ठाकरे आपल्या भाषणांमधून विरोधकांवर सडकून टीका करतात. पण ते कधीच कंबरेखालची टीका करत नाहीत. ते मुद्द्यावर आणि चपखल शब्दांत विरोधकांवर निशाणा साधतात. विशेष म्हणजे ते सत्य परिस्थितीवर बोलतात. त्यामुळे ते जास्त लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे तरुणांमध्ये त्यांची जास्त क्रेझ आहे. त्यामुळे त्यांचा भाजपला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा होऊ शकतो.