महाराष्ट्रातील शहरांचे ब्रँडींग करण्याची संधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं

देशभरात परिषदेच्या १६१ बैठका भारतात होणार आहेत. त्यापैकी १४ बैठका महाराष्ट्रात होतील.

महाराष्ट्रातील शहरांचे ब्रँडींग करण्याची संधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं
एकनाथ शिंदे
| Edited By: | Updated on: Dec 02, 2022 | 6:51 PM

मुंबई : भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले, ही अतिशय गौरवशाली बाब आहे. महाराष्ट्रात या परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. त्यानिमित्त आपल्या राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचे ब्रँडींग करण्याची संधी आहे. जगभरात महाराष्ट्राचे नावलौकीक वाढावा यासाठी शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता यांवर भर दिला जाईल. जास्तीत जास्त लोकांचा सहभाग यात वाढवावा,  असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. जी २० परिषदेनिमित्त महाराष्ट्रात होणाऱ्या बैठकांच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

१ डिसेंबरपासून भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. ते ३० नोव्हेंबर २०२३ भारताकडे राहणार आहे. याकालावधीत देशभरात परिषदेच्या १६१ बैठका भारतात होणार आहेत. त्यापैकी १४ बैठका महाराष्ट्रात होतील. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या महानगरांमध्ये या बैठका होणार आहेत.

१३ ते १६ डिसेंबर याकालावधीत मुंबईमध्ये परिषदेच्या विकास कार्य गटाची बैठक होणार आहे. या परिषदेच्या आखणी व नियोजनाकरिता चार अधिकाऱ्यांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाला जी २० परीषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. देशाचे आणि आपल्या राज्याचे जगात नावलौकीक करण्यासाठी ही संधी आहे.

त्यासाठी शहर सौंदर्यीकरणावर अधिक भर द्यावा. रस्त्यांची दुरूस्ती, चौकांचे सुशोभीकरण, रोषणाई याबाबींवर भर देऊन परिषदेच्या बैठक काळात शहरांचा चेहरामोहरा बदलावा. आपल्या राज्याचे आणि शहराचे जगात ब्रँडींग करण्यासाठी याचा उपयोग करू घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.