एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढीची ऑफर, उद्या पुन्हा बैठक; अनिल परब यांची माहिती

| Updated on: Nov 24, 2021 | 3:52 PM

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढीची ऑफर, उद्या पुन्हा बैठक; अनिल परब यांची माहिती
अनिल परब, परिवहन मंत्री
Follow us on

मुंबई: एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. उद्या सकाळी पुन्हा एकदा बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे संपावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटीचे प्रतिनिधी यांच्यात आज बैठक झाली. सुमारे दोन तास ही बैठक चालली. त्यानंतर अनिल परब यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. कोर्टाने विलीनीकरणाचा विचार करण्यासाठी समिती नेमली आहे. समितीचा जो काही अहवाल येईल तो आम्ही मान्य करू. पण तोपर्यंत संप चालू राहू शकत नाही. त्यामुळे कामगारांना अंतरिम वाढ देण्याचा पर्याय दिला आहे. सकारात्मक चर्चा झाली. आम्ही ऑफर दिली आहे. उद्या सकाळी 11 वाजता या संदर्भात पुन्हा बैठक होणार आहे, असं परब म्हणाले.

दोनतीन पर्याय दिले

आम्ही पैशाची ऑफर दिली नाही. संघटनेला दोन- तीन पर्याय दिले आहेत. अंतरिम वेतनवाढ देऊ शकतो. वाढ दिल्यानंतर समितीने एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय दिला तर विलीनीकरणानंतरही पगारवाढ दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करू शकत नाही

गेले काही दिवस एसटीचा संप सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी एसटीच्या विलीनीकरणाची मागणी लावून धरली आहे. या मागणीबाबत तिढा कायम होता. आज कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्यासोबत चर्चा झाली. सविस्तर चर्चा झाली. वेतन वेळेवर मिळाव. वेतन वाढावं अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. उच्च न्यायालयाने समिती बनवली आहे. समितीकडे सध्या हा विषय आहे. 12 आठवड्यात अहवाल द्यायचा आहे. मुख्यमंत्री हा अहवाल कोर्टात सादर करतील. कोर्टाच्या आदेशाचं कोणीच उल्लंघन करू शकत नाही. कामगारांना जे जे हवं आहे ते आम्ही देत आहोत. एका बाजूने समितीची प्रक्रिया सुरू आहे. याला बराच कालावधी लागणार आहे. तिढा कायम राहू नये. तोपर्यंत दुसरा पर्याय असेल तर द्यावा. अंतरीम वाढ द्यायचाही पर्याय आहे, असं त्यांनी सांगितलं.

दोन पावलं मागे घ्या

कामगारांनी अधिक ताणू नये. सरकार दोन पावलं पुढे यायला तयार आहे. तुम्ही दोन पावलं मागे या. चर्चेने मार्ग काढू अस सांगतानाच कामगारांनी संप मागे घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. तसेच या संपात कोणतंही राजकारण केलं जात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

संबंधित बातम्या:

‘मोदी सहजासहजी माघार घेणारे नाहीत, माफी मागितली म्हणजे त्यांचा होमवर्क झालेला होता’, जयंत पाटलांचा खोचक टोला

सुधींद्र कुलकर्णी, जावेद अख्तर यांची ममता बॅनर्जींशी भेट, काँग्रेस नेते कीर्ती आझाद यांचा टीएमसीमध्ये प्रवेश

‘ओ शेठ… तुम्ही नादच केलाय थेट…’ शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्याच नेत्याने धरला ठेका; गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष