Badlapur Encounter : अक्षय शिंदेच्या चेहऱ्यावरच का लागली गोळी? पोलिसांची बाजू तरी काय? नेमकं घडलं तरी काय

Akshay Shinde Encounter : बदलापूर लहान मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एनकाऊंटरमध्ये मृत्यू झाला. पोलीस त्याला चौकशीसाठी तळोजा तुरुंगातून बदलापूर येथे घेऊन जात होती. तेव्हा त्याने पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावली आणि गोळीबार सुरु केला.

Badlapur Encounter : अक्षय शिंदेच्या चेहऱ्यावरच का लागली गोळी? पोलिसांची बाजू तरी काय? नेमकं घडलं तरी काय
बदलापूर एनकाऊंटर अक्षय शिंदे
| Updated on: Sep 24, 2024 | 9:11 AM

बदलापूर येथील शाळेत दोन मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा सोमवारी पोलीस एनकाऊंटरमध्ये मारल्या गेला. सोमवारी पोलीस त्याला चौकशीसाठी तळोजा कारागृहातून बदलापूर येथे घेऊन जात होती. तेव्हा त्याने पोलीस अधिकाऱ्याची पिस्तूल हिसकावली आणि त्यातून तीन राऊंड गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत तो मारल्या गेला. पण या कारवाईवर विरोधकांकडून आणि माजी अधिकाऱ्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे. गोळी त्याच्या चेहऱ्यावर का लागली हा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी आता उत्तर दिले आहे.

हा कट आला जीवाशी

बदलापूर येथील शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा अक्षय शिंदे याने पळून जाण्याचा कट रचल्याचा दावा करण्यात येत आहे. पण हा कटच त्याच्या जीवाशी आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अक्षय शिंदे याला चार पोलीस व्हॅनमधून नवी मुंबईतील तळोजा तुरुंगातून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी घेऊन येत होते. संध्याकाळी जवळपास 6:15 वाजता ठाण्यामधील मुंब्रा बायपास जवळ पोलिसांचे वाहन आले. तेव्हा अक्षय शिंदे याने सहायक पोलीस निरीक्षक मोरे (API More) यांची पिस्तूल हिसकावली. त्याने गोळीबार सुरू केला. तीन राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी एपीआय मोरे यांना लागली. तर पोलीस निरीक्षक संजय शिंदे जखमी झाले.

चेहऱ्यावरच का लागली गोळी?

जेव्हा आरोपीने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्यात पोलीस सहायक पोलीस निरीक्षक मोरे हे जखमी झाले. ते आरोपीसोबत मागे बसले होते. वाहनात चालकासोबत पोलीस निरीक्षक संजय शिंदे हे होते. पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी पिस्तूलमधून अक्षय शिंदेवर गोळी झाडली. व्हॅनमध्ये जागा कमी असल्याने गोळी थेट त्याच्या चेहऱ्यावर लागली. त्यामुळे अक्षय शिंदे याचा जागेवरच मृत्यू झाला.

आईला पोलिसांवर नाही विश्वास

आरोपी शिंदे याची आई अलका शिंदे हिने ठाण पोलिसांचे दावे नाकारले आहेत. एनकाऊंटरसाठीचे सर्व कारणं त्यांनी नाकारले आहेत. “मी सोमवारी तळोदा तुरुंगात संध्याकाळी जवळपास 4:30 वाजता त्याची भेट घेतली होती. सकाळपासून त्याला भेटण्यासाठी गेली होती. शेवटी मला त्याच्याशी 15 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली. गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती त्याने दिली. मला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी, जामिनासाठी काय करत आहे.” अशी विचारणा त्याने केल्याचे अलका शिंदे यांनी सांगितले. तर गेल्या सोमवारी भेटायला गेली तेव्हा अक्षयाला पोलिसांनी मारल्याचे अलका शिंदे यांनी सांगितले.