त्या दिवशी माझ्यासोबत काय घडलं? आमदार नमिता मुंदडांनी सांगितली आपबिती, बीडमध्ये पोलिसांचा धाक नसल्याची टीका!

| Updated on: Mar 07, 2022 | 2:39 PM

महिला दिनाच्या (Women's Day) पार्श्वभूमीवर भाजप आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी बीडमध्ये त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगून बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं.

त्या दिवशी माझ्यासोबत काय घडलं? आमदार नमिता मुंदडांनी सांगितली आपबिती, बीडमध्ये पोलिसांचा धाक नसल्याची टीका!
भाजप आमदार नमिता मुंदडा
Follow us on

मुंबईः महिला दिनाच्या (Women’s Day) पार्श्वभूमीवर भाजप आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी बीडमध्ये त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगून बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं. बीडमध्ये सध्या कुणाचा धाक राहिलेला नाही. गुंडगिरी (Beed Crime) प्रचंड प्रमाणात वाढली आहे, अशी टीका करत त्यांनी एक गंभीर घटना सांगितली. आठवडाभरापूर्वी काही दारु प्यायलेल्या लोकांनी माझ्यासोबत फोटो काढायचे म्हणून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. एक आमदार असून माझ्याबाबतीत असं घडतंय, तर सामान्य महिलांच्या सुरक्षितेतचं काय होत असेल, असा प्रश्न त्यांनी विचारला. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारु विक्री सुरु असून त्यावर कुणाचाही धाक राहिलेला नाही, असा आरोप करत नमिता मुंदडा यांनी अप्रत्यक्षपणे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. विधीमंडळाच्या अधिवेशनातदेखील बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवरून लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या.

काय घडलं त्या दिवशी?

आमदार नमिता मुंदडा यांनी आज मुंबईत बोलताना बीडच्या सुरक्षा व्यवस्थेवर ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या, ‘ बीड जिल्ह्यात पोलिसांचा धाक राहिलेला नाही. बीड जिल्ह्यात जे अवैध धंदे सुरु आहेत दारुविक्री, मटका व्यवसाय त्यात पोलिसांचा पूर्णपणे सहभाग आहे. उद्या महिला दिन आहे. एक आठवडा आधी, मी माझ्या घरासमोर असलेल्या रसवंती गृहात माझ्या दोन वर्षांच्या लहान बाळासह रस प्यायला गेले होते. त्याच्या समोर एक ढाबा आहे, तिथे ओपन दारुविक्री सुरु होती. तिथून रस्ता क्रॉस करुन तिघे जण आले आणि त्यांनी माझ्यासोबत फोटो काढायचा आग्रह धरला. तिथे दारुच्या बाटल्या दिसत होत्या. मी माझ्या मुलीसोबत आहे, मला फोटो काढायचा नाही असं सांगितलं. तर त्यांनी ढकलाढकली केली, मोठा गोंधळ घातला. माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मी पोलिसात तक्रार केली, तर ते एक तासाने आले पण त्यांनी आरोपींना पकडलंही नाही. आम्ही आमच्या गाड्यांमध्ये त्यांना टाकून पोलिस स्टेशनला नेलं. आतापर्यंत एसपींनी मला फोन केला नाही, माझ्या फोनला उत्तर दिलं नाही. डीवायएसपी अंबाजोगाई यांनी लक्ष घातलं नाही. मी महिला आमदार असून सुरक्षित नाही, मग बीडच्या महिला कशा सुरक्षित राहतील, मी लक्षवेधी मांडली तेव्हा पोलिसांवर कारवाई करण्यात आली, अशा अनुभव नमिता मुंदडा यांनी सांगितला.

बीडच्या गुन्हेगारीवर विधानसभेत लक्षवेधी

विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजच्या अधिवेशनात बीडमधील गुन्हेगारीवर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली. मागील काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी स्वरुपाच्या घडामोडींमध्ये वाढ झाली आहे. हत्या, बलात्कार, प्राणघातक हल्ले, गोळीबार त्यासोबतच वाळू माफियांच्या कारवाया आणि जिल्ह्यातील मशीद आणि देवस्थानच्या जमिनी बळकावल्याची अनेक प्रकरणं यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं ठाकलं आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. बीडमध्ये मागील वर्षभरात दुप्पट गुन्हे दाखल झाले आहेत. यावर पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री यांना पत्र पाठवून बैठक बोलवण्याची विनंती केली होती. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये जिल्हाधिकारी परिसरात जमीनीच्या मालकीच्या वादातून गोळीबार झाला होता. राष्ट्रावीदचे आमदार प्रकाश सोळंके आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार बाळासाहेब आजबे या तीन आमदारांनी बीड जिल्ह्यातल्या सुरक्षेसंदर्भात अधिवेशनात लक्षवेधी तक्रार दाखल केली आहे.

इतर बातम्या-

Chickpea Crop: खरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणी अधिक, उत्पादन वाढले पण विकायचे कुठे?

IPL 2022: वानखेडेसह अन्य स्टेडियम्सवर खेळण्याचा मुंबई इंडियन्सला कितपत फायदा मिळणार? क्रिकेट एक्सपर्ट म्हणतात…