मोठी बातमी: कोरोनामुळे भाजपच्या माजी आमदाराचे निधन

डहाणू विधानसभा मतदारसंघात पास्कल धनारे यांनी पहिल्यांदा भाजपला विजय मिळवून दिला होता. | BJP Paskal Dhanare coronavirus

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:26 AM, 12 Apr 2021
मोठी बातमी: कोरोनामुळे भाजपच्या माजी आमदाराचे निधन
पास्कल धनारे, माजी आमदार, भाजप

पालघर: भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गुजरातच्या वापी येथील रेनबो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, सोमवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पास्कल धनारे (Paskal Dhanare) हे 2014 साली डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. डहाणुतून निवडून येणारे ते भाजपचे (BJP) प्रथम आमदार होते. (BJP ex mla Paskal Dhanare  died due to coronavirus)

काही दिवसांपूर्वी पास्कल धनारे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर धनारे यांची प्रकृती सातत्याने ढासळत गेली. त्यामुळे पास्कल धनारे यांना वापी येथील रेनबो रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र, ही झुंज अपयशी ठरली आहे.
कम्युनिस्ट आणि काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या डहाणू विधानसभा मतदारसंघात पास्कल धनारे यांनी पहिल्यांदा भाजपला विजय मिळवून दिला होता. मात्र, नंतरच्या काळात पास्कल धनारे यांचा मतदारसंघातील जनसंपर्क कमी झाला होता. त्यामुळे पास्कल धनारे यांनी पक्षाची नाराजीही ओढावून घेतली होती. 2019 च्या निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारीही दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक राजकीय नेते, समाजसेवक, सेलिब्रेटींना कोरोनाची लागण होत आहेत. महाराष्ट्रातील काही नेत्यांना कोरोनामुळे जीवही गमवावा लागला आहे.

शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडेंचा मृत्यू

नाशिक प्रभाग क्रमांक 24 चे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नाशिकमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कल्पना पांडे यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या निधनाने शिवसेनेसह महापालिकेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या रणरागिनी अशी त्यांची ओळख होती.

भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांचे कोरोनामुळे निधन

तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वरखंडे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 4 एप्रिलला त्यांच्यावर गुजरातमधील वापीमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून लक्ष्मण वरखंडे कोरोनाशी झुंज देत होते.

पण त्यांची कोरोनाची झुंज अपयशी ठरली आहे. लक्ष्मण वरखंडे यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकरांचा मृत्यू

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिलोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर यांचे शनिवारी पहाटे मुंबईत निधन झाले. सामान्यांशी नाळ जोडलेला आणि तळागाळात जाऊन काम करणारा नेता म्हणून रावसाहेब अंतापूरकर यांची ओळख होती.

साधारण 25 दिवसांपूर्वी रावसाहेब अंतापूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला काही दिवस त्यांच्यावर नांदेडच्या भगवती रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 12 दिवसांपासून बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रावसाहेब अंतापूरकर यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार पाहायला मिळत होते. दरम्यानच्या काळात त्यांना हृदयविकाराचा एक झटकाही येऊन गेला होता.

संबंधित बातम्या :

काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन

शिवसेनेच्या रणरागिणीला कोरोनाने गाठलं, नाशिकच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन

Raosaheb Antapurkar: दोनवेळा आमदारकी मिळवली, पण शेवटपर्यंत भाड्याच्या घरातच मुक्काम

(BJP ex mla Paskal Dhanare  died due to coronavirus)