दाऊदला क्लीन चिट मिळणार, भाजप नेत्याचा ठाकरे सरकारला टोला

| Updated on: Dec 03, 2019 | 8:32 AM

आरे कारशेड आणि नाणार रिफायनरी प्रकल्पातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

दाऊदला क्लीन चिट मिळणार, भाजप नेत्याचा ठाकरे सरकारला टोला
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर भाजपचा तिळपापड होताना दिसत आहे. ‘राज्य सरकारकडून गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सुरु झाला आहे, आता दाऊदला क्लीन चिट मिळणार’ अशा आशयाचं ट्वीट भाजप मुंबईचे सरचिटणीस मोहित भारतीय (BJP Leader taunts Thackeray Govt) यांनी केलं आहे.

‘सूत्र : दाऊदवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता आहे आणि लवकरच त्याला महाराष्ट्र सरकारकडून क्लीन चिट मिळू शकेल. कारण सध्या गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सुरु झाला आहे. त्वरा करा, मर्यादित दिवस बाकी’ असं ट्वीट मोहित भारतीय (Mohit Bharatiya) यांनी केलं आहे.

याआधी, मोहित भारतीय  यांनी एकामागून एक ट्वीट करत महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल चढवला होता. ‘महाराष्ट्रात लोकशाहीची अशी अवस्था पाहावयाला मिळत आहे की, विधानसभेत 288 उमेदवार निवडून येऊनसुद्धा त्यातील एकही मुख्यमंत्री होऊ शकला नाही.’ असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

‘आरे प्रकरणातील आरोपींची यादी मुंबई पोलिस जाहीर करु शकतात का? मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले आहेत. आरोपी हे ख्रिश्चन मिशनरी आणि कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आहेत. यामागे काय राजकारण आहे?’ असा सवालही मोहित भारतीय यांनी विचारला आहे.

‘आरेचे एकूण क्षेत्र सुमारे 3156 हेक्टर आहे. मेट्रो कारशेडसाठी केवळ 25 हेक्टर क्षेत्र वापरले आहे. म्हणजेच 2 टक्क्यांपेक्षाही कमी. काही जणांना मुंबईतील वाहतूक कोंडी कमी व्हावी, असं वाटत नाही का? या सगळ्यामागे राजकारण काय आहे?’ असंही त्यांनी विचारलं (BJP Leader taunts Thackeray Govt) होतं.

आरे आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे

आरे कारशेड आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे नाणारविरोधी आंदोलनातील कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून नितेश राणेंची ‘ती’ मागणी मान्य

मेट्रो प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील झाडं तोडण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ पर्यावरणप्रेमींनी मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी 29 जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते.

नाणारला विरोध म्हणून आंदोलकांनी 2018 मध्ये रामेश्वर काटे कोलवाडी येथे भाजप नेत्यांची वाहनं अडवली होती. या प्रकरणी 350 हून अधिक आंदोलकांवर विजयदुर्ग पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

मार्च 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचं आश्वासन संघर्ष समितीला दिलं होतं, मात्र त्यानंतरही फडणवीस यांनी हे गुन्हे मागे घेतले नव्हते.