Bhandup Fire | …म्हणून महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त, अतुल भातखळकरांचा शिवसेनेवर निशाणा

| Updated on: Mar 26, 2021 | 3:50 PM

सनराईज हॉस्पिटलवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे का? असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे. (Atul Bhatkhalkar Comment on Bhandup Fire)

Bhandup Fire | ...म्हणून महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त, अतुल भातखळकरांचा शिवसेनेवर निशाणा
अतुल भातखळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : भांडूपच्या ड्रिम मॉलमध्ये सनराईज रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीवर भाजपकडून संशय व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे निकटवर्तीय असलेल्या वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक असल्यामुळेच महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त आहे का? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar Comment on Bhandup mall hospital fire)

वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक

भांडूपच्या ड्रीम मॉल मधील अनधिकृतपणे कोविड सेंटर उभे राहते याची साधी माहिती सुद्धा महानगरपालिकेला नसल्याचे स्वतः महापौर कबूल करतात. या ड्रीम मॉलमध्ये पीएमसी बँक घोटाळ्याचे सूत्रधार असलेल्या वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक आहे. त्यामुळे शिवसेनेने या मॉलवर आणि अनधिकृतपणे उभे राहिलेल्या सनराईज हॉस्पिटलवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे का? असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.

याप्रकरणी मॉल, हॉस्पिटलचे संचालक आणि व्यवस्थापकीय मंडळासोबतच हा मॉल बेकायदेशीरपणे सुरू ठेवण्यासाठी ज्यांचा वरदहस्त आहे. त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

ड्रीम मॉलची अग्निसुरक्षा व्यवस्था कुचकामी

डिसेंबर महिन्यात भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईतील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करुन घेण्याची मागणी मी स्वतः केली होती. त्यावेळी उघड झालेल्या माहितीत मुंबईमध्ये 1390 रुग्णालये आणि नर्सिंग होम अनधिकृतपणे सुरु होते. त्यात कोणत्याही प्रकारची आगरोधक सुरक्षा नसल्याचे समोर आले होते.

इतकेच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेकडून फेब्रुवारी महिन्यात करण्यात झालेल्या एका सर्व्हेनुसार 29 मॉलमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्था कुचकामी असल्याचे समोर आले होते. आज ज्या ड्रीम मॉलला आग लागली त्याचा सुद्धा या यादीत समावेश होता. या आगीत दुर्दैवी मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची थेट आर्थिक मदत करण्यात यावी. ही रक्कम मॉल आणि रुग्णालयाकडून वसूल करावी असेही अतुल भातखळकर म्हणाले.

10 जणांचा मृत्यू

सनराईस रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दहा जणांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला आहे. त्यात दोन कोरोना रुग्णांचा समावेश असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. या मॉलला रात्री 12च्या सुमारास आग लागली. आग अत्यंत भीषण असल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी 11 तास लागले. आग नियंत्रणात आली असली तरी अधूनमधून आग भडकत असल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

61 जणांना बाहेर काढलं

या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून रुग्णालयातील 61 जणांना सुखरूप बाहेर काढलं. आगीत अडकलेल्या चार जणांचा शोध सुरु आहे. या मॉलच्या चारही बाजूला आग पसरल्याने अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत होता. तब्बल 11 तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सध्या या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar Comment on Bhandup mall hospital fire)

संबंधित बातम्या : 

Bhandup mall fire: भांडूपच्या आगीचा पीएमसी बँकेशी संबंध?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…

Bhandup mall fire : भांडूप आगप्रकरणाची चौकशी करणार, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांची मागितली माफी