
मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) इथल्या पासपोर्ट ऑफिसमध्ये बॉम्बची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. पासपोर्ट कार्यालय आणि स्वच्छतागृहांमध्ये सायनाइड भरलेले 19 बॉम्ब ठेवल्याचा आणि आज दुपारी 1.30 वाजता त्यांचा स्फोट होईल, अशी धमकी देणारा हा ई-मेल मिळाल्यानंतर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या धमकीच्या ई-मेलची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब निकामी करणारं पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला असून बॉम्बशोधक पथकाने शोध घेतला असला काहीही आढळलं नाही. त्यामुळे ज्या ई-मेलद्वारे ही धमकी पाठवण्यात आली होती, त्याचा तपशील पोलीस घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी मुंबई पोलिसांकडून केली जात आहे.
बुधवारी बीकेसी इथल्या पासपोर्ट ऑफिसला तीन धमकीचे ई-मेल मिळाले. ज्यात दुपारी 1.30 वाजता पासपोर्स ऑफिस आणि स्वच्छतागृहांमध्ये ठेवलेले 19 सायनाइड बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. Sourav_biswas21@hotmail.com , rpo.mumbai@mea.gov.in आणि rpo.mumbai@cpo.gov.in या ई-मेल अॅड्रेसवर हे धमकीचे मेल मिळाले होते. त्यानंतर तात्काळ सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलिसांना याबद्दलची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांनी त्वरित कारवाईला सुरुवात केली. बीकेसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, एटीएस पथक आणि युनिट 8 चे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेत तपास सुरू केला होता.
खबरदारीचा उपाय म्हणून पासपोर्स ऑफिसची लॉबी, मुख्य प्रवेशद्वार, येण्या-जाण्याचे मार्ग, परिसरातील झाडंझुडुपं आणि आजूबाजूच्या सर्व परिसराची बॉम्ब शोधक आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने कसून तपासणी केली. सुदैवाने या तपासणीत त्यांना कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. तरीही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत पोलिसांनी नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच कुठेही संशयास्पद वस्तू आढळली तर तातडीने पोलिसांना कळवण्यास सांगितलं गेलंय.
अनेकदा धमकीचे असे बनावट ई-मेलसुद्धा पाठवले जातात. अशा खोट्या ई-मेलद्वारे भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं. याला आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी ई-मेल आयडीबाबत अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पासपोर्ट ऑफिसमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही सतर्क राहून सुरक्षा मानकांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.