BMC Election : एकनाथ शिंदेंकडून गुपचूप एबी फॉर्मचे वाटप, पाहा कुणाचं नशीब उघडलं?

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून चांदिवली, वडाळा, घाटकोपर आणि जोगेश्वरी येथील प्रमुख उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यांना एबी फॉर्मचे वाटप झाले आहे.

BMC Election : एकनाथ शिंदेंकडून गुपचूप एबी फॉर्मचे वाटप, पाहा कुणाचं नशीब उघडलं?
eknath shinde
| Updated on: Dec 30, 2025 | 8:41 AM

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा आपल्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष बोलावून एबी फॉर्मचे वाटप केले. महापालिकेत बंडखोरी टाळण्यासाठी कोणतीही अधिकृत यादी जाहीर न करता थेट उमेदवारांच्या हाती फॉर्म सोपवण्याची रणनीती एकनाथ शिंदे यांनी आखली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या महायुतीच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तब्बल ६ तास चाललेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर मुंबईतील २२७ जागांपैकी भाजप १३७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शिवसेना ९० जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेवटच्या जागेपर्यंत दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरु होती. मात्र आता युतीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.

आता एबी फॉर्म वाटप प्रक्रियेत वडाळ्याचे माजी नगरसेवक अमेय घोले यांना पहिला एबी फॉर्म देण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत इच्छुक उमेदवारांची नंदनवनवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांमध्ये धावपळ उडाली आहे. चांदिवली विधानसभा मतदारसंघात आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली सहा उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल आणि तो सनातन धर्माचा झेंडा घेऊन बसेल, असा विश्वास आमदार लांडे यांनी व्यक्त केला.

शिवसेनेने ६ उमेदवारांना मैदानात उतरवले

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चांदिवली विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेने ६ उमेदवारांना मैदानात उतरवले आहे. यामध्ये मीनल तुरडे (वॉर्ड १६६), अश्विनी माटेकर (वॉर्ड १५६), किरण लांडगे (वॉर्ड १६०), वाजिद कुरेशी (वॉर्ड १६२), शैला लांडे (वॉर्ड १६३) आणि विजय शिंदे (वॉर्ड १६१) यांना तिकीट देण्यात आले आहे. तर याव्यतिरिक्त, सुवर्णा करंजे (कांजूर-भांडुप), डॉ. अदिती खूरसंगे (वॉर्ड ११), परमेश्वर कदम (वॉर्ड १३३), पुष्पा कोळी (वडाळा), अश्विनी हांडे (भटवाडी-घाटकोपर), राजुळ पटेल (जोगेश्वरी) आणि वॉर्ड २०९ मधून यामिनी जाधव यांसारख्या प्रमुख चेहऱ्यांनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी अर्ज (एबी फॉर्म) देण्यात आले आहेत. बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेनेने अवलंबलेली ही गुपित पद्धत निवडणुकीच्या राजकारणात किती यशस्वी ठरते, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.