Anil Kokil Ward No 204 : उमेदवारी जाहीर होताच अर्ध्या तासात लालबाग-परळमध्ये बंडखोरी, उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा झटका

Anil Kokil Ward No 204 : बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक घडले ते याच परळ-लालबागमध्ये. एकेकाळचा कम्युनिस्टांचा हा गड बाळासाहेबांनी तरुण शिवसैनिकांच्या बळावर जिंकला. आता याच परळ लालबागमध्ये बंडखोरी झाली आहे.

Anil Kokil Ward No 204 : उमेदवारी जाहीर होताच अर्ध्या तासात लालबाग-परळमध्ये बंडखोरी, उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा झटका
Anil Kokil
| Updated on: Dec 30, 2025 | 3:49 PM

परळ-लालबाग हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागातील शिवसेनेचा उमेदवार हमखास निवडून येतो. मागच्या अनेक वर्षांपासून हा सिलसिला सुरु आहे. परळ-लालबागच्या वॉर्ड क्रमांक 203 आणि 204 मधून शिवसेनेच्या नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी अगदी सहज निवडणुका जिंकल्या आहेत. नारायण राणेंच बंड असो, राज ठाकरेंची शिवसेनेला सोडचिठ्ठी किंवा एकनाथ शिंदे यांचं बंड परळ-लालबागने नेहमीच ठाकरे कुटुंबाला साथ दिली आहे. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक घडले ते याच परळ-लालबागमध्ये. एकेकाळचा कम्युनिस्टांचा हा गड बाळासाहेबांनी तरुण शिवसैनिकांच्या बळावर जिंकला. आता याच परळ लालबागमध्ये बंडखोरी झाली आहे.

वॉर्ड क्रमांक 204 मधून उद्धव ठाकरे यांनी किरण तावडेंना उमेदवारी जाहीर करताच अनिल कोकीळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. अर्ध्या तासात प्रभाग क्रमांक 204 मधून अनिल कोकीळ यांना लगेच एबी फॉर्म मिळाला. खासदार मिलिंद देवरा यांनी त्यांना एबी फॉर्म दिला. आता अनिल कोकीळ वॉर्ड क्रमांक 204 मधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असतील. याच वॉर्डमध्ये बंडखोरी होण्याची भिती होती. शेवटी तेच घडलं. मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांना उद्धव ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही बंडखोरी झाली आहे.

उद्धव ठाकरेंना ही लढाई जड जाऊ शकते

अनिल कोकीळ हे 2017 साली वॉर्ड क्रमांक 204 मधून नगरसेवक बनले. लालबाग-काळाचौकीचा काही भाग त्यांच्या मतदारसंघात येते. तगडा जनसंपर्क ही त्यांची खासियत आहे. त्या बळावर मतदारसंघात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. मतदारसंघातील कामांच्या बाबतीत ते उजवे आहेत. त्यामुळे लालबागच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंना ही लढाई जड जाऊ शकते. उद्धव ठाकरे गटातील या बंडखोरीमुळे भविष्यात एकनाथ शिंदे गटाचा मोठा फायदा झाला आहे. कोकीळ वॉर्ड क्रमांक 204 मधून अधिकृत शिवसेनेचे उमेदवार असतील. जमेची बाजू म्हणजे त्यांच्याकडे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आहे. यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक खूप प्रतिष्ठेची आहे.