Sanjay Raut : महापालिकेच्या निवडणुका जाहीर, पण राज-उद्धव युतीची घोषणा कधी? संजय राऊत यांनी सांगितला टायमिंग

"स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचं आवाहन असेल, तुम्ही वेगळी चूल मांडून भाजपला मदत होईल अशी भूमिका घेऊ नये. लोक विसरणार नाहीत. भविष्यात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका आहेत" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : महापालिकेच्या निवडणुका जाहीर, पण राज-उद्धव युतीची घोषणा कधी? संजय राऊत यांनी सांगितला टायमिंग
Raj-Uddhav Thackeray
| Updated on: Dec 16, 2025 | 11:01 AM

मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. पण अजून ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा झालेली नाही. त्या बद्दल आज खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं. “अधिकृत युतीची घोषणा झालेली नाही, हा प्रश्न तुम्ही महायुतीला का विचारत नाही? महायुती नावचं जे त्रांगड आहे, एकत्र येणार एकत्र लढणार त्यांना प्रश्न विचारता का?. ठाकरे बंधुंना हा प्रश्न का विचारता? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढत आहेत. महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शाहंच्या पायावर डोकं ठेवावं लागतं. आमच्याशी युती करा युती करा, बाबा लगीन, बाबा लगीन” असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं.

“या क्षणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. मुंबई महापालिका, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे, नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये एकत्र लढत आहोत. इतर ठिकाणी दोन्ही पक्षांचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते निर्णय घेतील. पण ही लढाई 29 महापालिकांपेक्षा मुंबईची आहे. संयुक्त महाराष्ट्राची मुख्य लढाई मुंबईसाठी होती. मुंबई महाराष्ट्रात रहावी यासाठी होती. संयुक्त महाराष्ट्राचा लढा 1956 साली सुरु झाला. त्यासाठी 106 लोकांनी बलिदान दिलं” असं संजय राऊत म्हणाले.

रहमान डकैत कोण?

“आम्ही मुंबई अमित शाहंच्या घशात जाऊ देणार नाही. रहमान डकैत कोण? कोणाला मुंबई लुटायचीय? त्यांना पाठबळ देणारे कोण आहेत? या मुंबईचं कराची ल्यारी शहर कोणी केलं? हे महाराष्ट्राला देशाला माहित आहे” असं संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे-राज ठाकरे अधिकृत युतीची घोषणा कधी करणार? या प्रश्नावर ‘येत्या आठवड्यात घोषणा व्हायला हरकत नाही’ असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं. “प्रक्रिया सुरु झालेली आहे. एक तारखे नंतरचे पुढचे 14-15 दिवस प्रचाराचे आहेत. आता जेव्हा दोन पक्षाचे प्रमुख एकत्र येतात, तेव्हा त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेलच, घोषणा करण्याचा, जागा वाटपाचा हे जर असेल, तर तुमच्या मनात अशा शंका येता कामा नये” असं संजय राऊत म्हणाले.

काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं दिसत नाही

“काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं दिसत नाही. बिहारच्या निकालानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. मुंबईच्या या लढाईत त्यांनी आमच्याबरोबर असायला पाहिजे. आम्ही त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोललो, त्यांनी निर्णय स्थानिक पातळीवर सोडलेला आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचं आवाहन असेल, तुम्ही वेगळी चूल मांडून भाजपला मदत होईल अशी भूमिका घेऊ नये. लोक विसरणार नाहीत. भविष्यात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका आहेत” असं संजय राऊत म्हणाले.