दीड फूट सळई छातीतून आरपार, BMC रुग्णालयानं सलग 3 तास शस्त्रक्रिया करत जीव वाचवला

| Updated on: Jun 26, 2021 | 4:25 PM

मुंबई : विक्रोळी पूर्व परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पडलेली सुमारे दीड फूट लांबीची सळई (कांब) खालच्या मजल्यावर काम करत असलेल्या एका 29 वर्षीय कामगार महिलेच्या छातीत आरपार घुसली. त्या ठिकाणी असलेल्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना. मात्र, शीव परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी सलग 3 तास चाललेल्या […]

दीड फूट सळई छातीतून आरपार, BMC रुग्णालयानं सलग 3 तास शस्त्रक्रिया करत जीव वाचवला
Follow us on

मुंबई : विक्रोळी पूर्व परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पडलेली सुमारे दीड फूट लांबीची सळई (कांब) खालच्या मजल्यावर काम करत असलेल्या एका 29 वर्षीय कामगार महिलेच्या छातीत आरपार घुसली. त्या ठिकाणी असलेल्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना. मात्र, शीव परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी सलग 3 तास चाललेल्या शस्त्रक्रियेदरम्यान अथक प्रयत्न करून महिलेच्या छातीतील सळई कौशल्यपूर्वक काढली. त्यामुळे या महिलेचा जीव वाचला असून आता महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनात ही अत्यंत अवघड कामगिरी यशस्वीपणे पार पडली (BMC Lokmanya hospital save the life of labor women of Vikroli accident).

शनिवारी (19 जून 2021) विक्रोळी पूर्व परिसरात निर्माणाधीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी एक पती-पत्नी कामगार म्हणून कार्यरत आहेत. यातील कामगार असणारी महिला खालच्या मजल्यावर आपले नेमून दिलेले बांधकाम विषयक काम करीत होती. हे काम करत असतानाच साधारणपणे दुपारी 3 वाजताच्या सुमारास वरच्या मजल्यावरून एक सळई पडली. ही सळई दुर्दैवाने महिलेच्या छातीत आरपार घुसली. त्यानंतर या अत्यंत गंभीर अवस्थेतील महिलेला तात्काळ महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारानंतर सदर महिलेची गंभीर परिस्थिती बघून तिला शीव परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याच लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास हलविण्यात आले.

‘बेड’वर झोपवणेही शक्य होत नसताना यशस्वी शस्त्रक्रिया

या महिलेची असलेली अत्यंत गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या महिलेच्या छातीत सळई आरपार घुसलेली असल्यामुळे या महिलेला शस्त्रक्रिया गृहातील (Operation Theatre) ‘बेड’वर झोपवणेही शक्य होत नव्हते. बऱ्याच प्रयत्नानंतर या महिलेस एका कुशीवर झोपवून ही शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात आली. साधारणपणे सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास सुरू झालेली ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया रात्री 10 वाजेपर्यंत म्हणजेच सलग 3 तास सुरू होती.

12 व्यक्तींच्या वैद्यकीय पथकाकडून सलग 3 तास शस्त्रक्रिया

या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयातील 3 विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांचा समावेश असलेली 12 व्यक्तींचं वैद्यकीय पथक अथकपणे कार्यरत होती. ही घटना घडली, त्याच दिवशी रात्री 10 वाजताच्या सुमारास अत्यंत अवघड शस्त्रक्रिया पूर्ण झाली आणि महिलेच्या छातीतून सळई यशस्वीपणे काढली. त्यामुळे महिलेचे प्राण वाचविण्यात यश आलं. आता घटनेच्या एका आठवड्यानंतर महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

वैद्यकीय पथकात कुणाचा समावेश?

ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणाऱ्या पथकामध्ये शल्यक्रिया विभागातील डॉक्टर विनीत कुमार, डॉक्टर रणजीत कांबळे, डॉक्टर पार्थ पटेल; हृदयशस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर कुंतल सुराणा, भूलतज्ज्ञ डॉक्टर तेजस्विनी जांबोटकर यांच्यासह डॉक्टर अमेय, डॉक्टर प्राजक्ता आणि परिचारिका श्रीमती तेजस्विनी गायकवाड आणि सहाय्यक भास्कर लहानगे यांचा समावेश होता, अशीही माहिती शल्यक्रिया विभागाचे प्रमुख तथा अधिष्‍ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी दिली.

या शस्त्रक्रियेत समर्पित भावनेने काम करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाचे आणि संबंधित परिचारिका, वॉर्डबॉय इत्यादी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी आणि उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) देविदास क्षीरसागर यांनी कौतुक केले आहे. तसेच या पथकाला चमूला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये ही अनेक गरजूंसाठी नवजीवन देणारी रुग्णालये असल्याची बाब नुकतीच पुन्हा एकदा या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.

हेही वाचा :

Job News:मुंबई महानगरपालिकेत सहायक आयुक्त, अधिष्ठाता संवर्गासाठी पदभरती, MPSC द्वारे होणार प्रक्रिया

मुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’

मुंबईकरांची चिंता मिटली; मालमत्ता करातील 14 टक्के दरवाढ रद्द

व्हिडीओ पाहा :

BMC Lokmanya hospital save the life of labor women of Vikroli accident