मुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’

एखाद्या विदेशी चित्रपटातील दृश्य वाटेल अशा BMC च्या पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण मुंबईत करण्यात आलं.

मुंबईत BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण, 240 वाहन क्षमतेची 21 मजली ‘पार्किंग’
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 25, 2021 | 3:54 AM

मुंबई : एखाद्या विदेशी चित्रपटातील दृश्य वाटेल अशा BMC च्या पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचं लोकार्पण मुंबईत करण्यात आलं. रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित व नूतनीकरण करण्यात आलेल्या या स्वयंचलित सार्वजनिक वाहनतळाचे लोकार्पण महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांची विशेष उपस्थिती होती. मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (24 जून 2021) हा लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता (Inauguration of BMC first automated robotic parking in Mumbai).

BMC चं पहिल्या स्वयंचलित वाहनतळ नेमकं कसं?

एका बहुमजली वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या एका भव्य पोलादी ‘प्लेट’वर एक कार उभी केली जाते. कारची नोंद पार्किंगच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या रिसेप्शन काऊंटरवर संगणकीय पद्धतीने केली जाते. त्यानंतर ज्या पोलादी प्लेटवर कार उभी असते, ती प्लेट स्वयंचलित पद्धतीने कारसह वाहनतळामध्ये प्रवेश करते. यानंतर तब्बल 21 मजली वाहनतळामध्ये असणाऱ्या भव्य लिफ्टमध्ये ती कार स्वयंचलित पद्धतीने सरकवली जाते. ज्यानंतर 21 मजल्यांपैकी ज्या मजल्यावर कार उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहे, त्या मजल्यावरील पार्किंगच्या ठिकाणी लिफ्ट स्वयंचलित पद्धतीनेच जाऊन ‘कार’ पार्क केली जाते.

हॉलिवूडमधील चित्रपटाप्रमाणे पार्किंग

याचप्रकारे पार्किंगमधून कार बाहेर काढताना देखील रोबोटिक व स्वयंचलित पद्धतीनेच ‘कार’ बाहेर पडते. हे एखाद्या विदेशी चित्रपटातील दृश्याचे वर्णन नसून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचे वास्तव आहे. या नूतनीकृत वाहनतळ लोकार्पण कार्यक्रमाला स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा, सी आणि डी विभागांच्या प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल यांच्यासह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड आणि मान्यवर उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वाहने उभी करण्यासाठी उपलब्ध जागेचा अधिकाधिक सुयोग्य वापर करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न, नियोजन व अंमलबजावणी करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई मार्ग येथे असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यातील नूतनीकृत वाहनतळाचं लोकार्पण करण्यात आलं.

पार्किंगचं वैशिष्ट्ये

1. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यक्षेत्रात असणा-या भुलाभाई देसाई मार्गालगत व सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराजवळ असणाऱ्या हबटाऊन स्कायबे या इमारतीमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित वाहनतळ आजपासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाले आहे.

2. या 21 मजली (Ground + 20) वाहनतळामध्ये साधारणपणे 240 वाहने उभी करता येईल, एवढी जागा उपलब्ध आहे.

3. या वाहनतळाला 2 प्रवेशद्वारे आहेत. 2 बहिर्गमनद्वारे आहेत. या वाहनतळाची स्वयंचलित प्रचालन क्षमता ही दर तासाला 60 वाहनांचे प्रचालन करण्याइतकी आहे.

4. हे वाहनतळ आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे 24 तास कार्यरत राहणार आहे.

5. हे वाहनतळ उभारण्यासाठी वापरण्यात आलेल्या सामुग्रीपैकी 80 टक्के सामुग्री भारतीय असून 20 टक्के सामुग्री ही आयात केलेली आहे.

6. या वाहनतळामध्ये स्वयंचलित पद्धतीने वाहनांची ने-आण करण्याकरीता 2 मोठे उद्वाहक असून या व्यतिरिक्त 2 शटल डिव्हाइस व 2 सिलोमेट डॉली आहेत. तसेच कार वळविण्यासाठी 4 स्वयंचलित टर्न टेबल देखील या वाहनतळामध्ये आहेत.

हेही वाचा :

PHOTOS : जगातील सर्वात महागडी पार्किंग, एवढ्या किमतीत आलिशान घरही बांधून होईल

अनधिकृत पार्किंग करणाऱ्या 241 वाहनांवर पालिकेची कारवाई

मुंबईकरांनो, अनधिकृत पार्किंग केल्यास 10 हजार रुपयांचा दंड

व्हिडीओ पाहा :

Inauguration of BMC first automated robotic parking in Mumbai

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें