Mumbai Corporators Fund : 12 वर्षांनंतर मुंबईतील नगरसेवकांच्या निधीत भरघोस वाढ, आधी 60 लाख मिळायचे आता..
Mumbai Corporators Fund : मुंबई महापालिका सभागृहाने नगरसेवकांच्या निधीत भरघोस वाढ करण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पूर्वी नगरसेवकांना 60 लाख रुपये निधी मिळत होता.

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी : मुंबई महापालिका सभागृहाने नगरसेवकांच्या निधीत भरघोस वाढ करण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पूर्वी नगरसेवकांना 60 लाख रुपये निधी मिळत होता. मुंबईतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि स्थानिक नागरी कामांना गती देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या नगरसेवकांना मिळणाऱ्या वार्षिक निधीमध्ये तब्बल 12 वर्षांनंतर वाढ करण्यात आली आहे. आता मुंबईतील नगरसेवकांना 60 लाख रुपयांऐवजी वार्षिक तब्बल 1 कोटी रुपयांचा स्वेच्छा निधी मिळणार आहे. महापालिका सभागृहाने या संदर्भातील प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली आहे.
नगरसेवक निधी वाढीच्या या प्रस्तावावर मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा सकारात्मक अभिप्राय आवश्यक आहे. तो मिळाला नाही, राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे हा प्रस्ताव पाठवला जाईल. वॉर्डातील रस्त्यांची डागडुजी, इमारतीच्या पाईपलाइन बदणे, सार्वजनिक प्रसाधनगृह बांधण्यासाठी, उद्यानाचे सुशोभिकरण, देखभाल यासाठी हा निधी दिला जातो.
विरोधी पक्षांचा आरोप काय?
मुंबई महापालिका सभागृहात प्रस्तावांच्या मंजुरीवरून विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. मुंबई महापालिका सभागृहाच्या कामकाजात महत्त्वाच्या प्रस्तावांच्या मंजुरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधकांना चर्चेची संधी न देता सुधार समितीचे 15 प्रस्ताव आणि ठरावाच्या सूचनांसह सुमारे 20 हजार कोटी रुपयांच्या 10 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला.
मुलुंड क्रीडा संकुलाचं आरक्षण बदलणार का?
सभेत सेव्हनहिल्स रुग्णालयाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव, मुलुंड डम्पिंग ग्राऊंडमधील 15 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी पाच वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देणे, मुलुंड क्रीडा संकुलाच्या आरक्षणात बदल करून पेट्रोल पंपासाठी जागा राखीव करणे, तसेच अंधेरीतील आंबिवली येथील 1,840 चौरस मीटर उद्यानाचे आरक्षण रद्द करून निवासी वापरासाठी खुली करण्याच्या प्रस्तावांचा समावेश होता.
सेंच्युरी मिलची जागा बिल्डरला देणार
लोअर परळमधील सेंच्युरी मिलची महापालिकेच्या मालकीची 6.17 एकर जागा 30 वर्षांसाठी खासगी विकासकाला भाडेपट्ट्याने देण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र देत मंजूर प्रस्तावांची अंमलबजावणी स्थगित ठेवण्याची मागणी केली आहे.
