धावत्या लोकलवर दारुची बॉटल फेकली, दोन महिलांना दुखापत

| Updated on: Jun 22, 2019 | 10:08 PM

दीड तास दोन्ही महिलांना कळवा शासकीय रुग्णालयाने बसवून ठेवलं आणि व्यवस्थित उपचार न देता जेजे हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे 21 तास उलटूनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

धावत्या लोकलवर दारुची बॉटल फेकली, दोन महिलांना दुखापत
Follow us on

मुंबई : धावत्या लोकलमध्ये महिला डब्यात दारूची बॉटल फेकल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. दीड तास दोन्ही महिलांना कळवा शासकीय रुग्णालयाने बसवून ठेवलं आणि व्यवस्थित उपचार न देता जेजे हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे 21 तास उलटूनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

डोंबिवलीत राहणाऱ्या आशा पाटील या ठाणे येथील एका खाजगी रुग्णालयात काम करतात. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आशा डोंबिवली ट्रेन पकडून घरी येत होत्या. आशा या महिला डब्ब्यात होत्या. ठाणे आणि कळवा दरम्यान सिडकोजवळ ट्रेनच्यामध्ये महिला डब्ब्यात दारूची बॉटल फेकली गेली. यामुळे आशा पाटील आणि मुंबई येथे राहणाऱ्या सुश्मिता गावकर या दोन्ही महिलांना डोक्यावर आणि हातावर गंभीर दुखापत झाली. या दोघींना कळवा छत्रपती शिवाजी रुग्णालयात रेल्वे पोलीस घेऊन गेले.

आशा पाटील यांचा आरोप आहे, की कळवा हॉस्पिटलमध्ये या दोन्ही महिलांना फक्त ड्रेसिंग करून दीड तास बसवून ठेवण्यात आलं. कोणत्याही प्रकारचा ठोस उपचार करण्यात आला नाही. उलट दोघींना जेजे हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला. रेल्वेमध्ये प्रवासा दरम्यान जीवघेणा हल्ला आणि नंतर कळवा हॉस्पिटलची वागणूक यामुळे आशा पाटील पूर्णपणे दुखावल्या गेल्या आहेत. आम्ही घराबाहेर पडावं की नाही? रेल्वे प्रवास करावा की नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे घटनेला 21 तास उलटूनही या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. ठाणे जीआरपीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता दाखणे यांचे म्हणणे आहे की, सुश्मिता गावकर हा महिला तक्रार देण्यास तयार नाही. आशा पाटील यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क 4 वाजेपर्यंत होऊ शकला नाही. शनिवारी सायंकाळी पोलिसांचं पथक आशा पाटील यांच्या जबानीसाठी रवाना झालं आहे. त्यांच्या जबानीनंतर गुन्हा दाखल केला जाईल. मात्र या प्रकरणी दाखणे यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.