Congress: नाशिक वृक्षतोडीवरून काँग्रेसचा व्यंगबाण; राज्यातील प्रमुखावर जिव्हारी टीका
Nashik Kumbha Mela: नाशिक येथील वृक्षतोडीविरोधात मोठं आंदोलन करण्यात येत आहे. अनेक दिग्गजांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. तपोवनातील वृक्ष तोडीविरोधात स्थानिकही आक्रमक झाले आहेत. दरम्यान या प्रकरणावरून काँग्रेसने व्यंगबाण सोडला आहे. त्याची मोठी चर्चा सुरू आहे.

Congress Caricature: नाशिक सिंहस्थ कुंभमेळा आता अवघ्या 10 महिन्यांवर येऊन ठेपला आहे. हा कुंभमेळा सुमारे 21 महिने चालेल. यामध्ये अमृतस्नान आणि इतर धार्मिक विदी पार पडतील. यावेळी लाखो साधू-संत आणि तितकेच भाविक भक्त येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पायाभूत सोयी-सुविधा उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासाठी कोट्यवधींचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. पण तपोवन येथे साधुग्राम उभारण्यासाठी 1,800 झाडं तोडण्यात येणार असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि मग त्याविरोधात मोठं आंदोलन उभं ठाकलं. या वृक्षतोडीला स्थानिकांनी आणि विविध पक्षांनी विरोध सुरु केला आहे. या मुद्यावरून काँग्रेसने राज्यातील प्रमुखावर जिव्हारी टीका केली आहे. झाडंखाऊ असं वाक्य लिहून एका व्यंगचित्राद्वारे काँग्रेसने संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. काँग्रेसने फेसबुकवर याविषयीची पोस्ट लिहिली आहे. त्याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे.
काय आहे हे व्यंगचित्र?
राष्ट्रीय काँग्रेसने हे व्यंगचित्र त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलं आहे. या पोस्टमध्ये सगळीकडं बेसुमार वृक्षतोड दाखवण्यात आली आहे. या चित्रात झाडं तोडल्यानंतर त्यांचे बुंधे तेवढे उरलेले दिसतात. तर एका मोठ्या व्यक्तीच्या हातात कुऱ्हाड दाखवली आहे. या व्यक्तीचा चेहरा काँग्रेसने दाखवलेला नाही. या चित्राच्या वरील भागात झाडखाऊ असं लिहिण्यात आलं आहे. या व्यंगचित्रातून नाशिकमधील वृक्षतोडीवर संताप व्यक्त करण्यात आल्याचं समोर येत आहे. काँग्रेसच्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. हे व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती
तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये याविषयीची माहिती दिली. वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर साधू महंतांसाठी भव्य डोम उभारला जाणार होता. हाच डोम पुढील 32 वर्षांसाठी खाजगी कंपनीमार्फत एक्जीबिशन सेंटर अर्थात प्रदर्शन केंद्र म्हणून वापरला जाणार होता. BOT तत्त्वावर होणाऱ्या या प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला होता. या सगळ्या विरोधानंतर अखेर या BOT तत्त्वावरील प्रदर्शन सेंटर उभारणीच्या 220 कोटी रुपयांचा निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे.
मनसेचे आज नाशिकमध्ये आंदोलन
तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात मनसेच्या चित्रपट सेनेकडून आंदोलन केले जाणार आहे. अमेय खोपकर यांच्यासह अनेक कलाकार आंदोलनात सहभागी होतील. तपोवन येथील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात मनसे देखील मैदानात उतरली आहे. चित्रपट सेनेच्या माध्यमातून मनसेचे तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. तर तपोवनातील वृक्ष तोडीसंदर्भातील शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका विक्षिप्त असल्याची टीका कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन यांनी केली. तपोवनातील वृक्ष तोडीच्या मुद्द्यावर राजकीय पोळी भाजू नका असा सल्लाही गिरीश महाजन यांनी शिंदेंच्या शिवसेनेला दिला.
