
उत्तर प्रदेशच्या बलरामपुरमध्ये अवैध धर्मांतराचे नेटवर्क चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा याच्यासंदर्भात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता छांगुर बाबा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा याच्याशी संबंधित उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उतरौलामध्ये १२ ठिकाणी तर मुंबईत २ अशा एकूण १४ ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. आज सकाळी ५ वाजल्यापासून ही छापेमारी सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवैध धर्मांतर प्रकरणी आरोपी असलेल्या छांगुर बाबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण आता याप्रकरणी ईडीनेही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सकाळी ईडीच्या अनेक पथकांनी बलरामपूरपासून ते मुंबईपर्यंत एकाच वेळी छापे टाकले. तब्बल १४ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. या १४ ठिकाणांहून ईडीच्या अधिकाऱ्यांना अनेक महत्त्वाची कागदपत्रे मिळाल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईतील वांद्रे आणि माहिम परिसरात ईडीने छापेमारी केली. ईडीच्या पथकाने सकाळी ५ वाजता माहीम आणि वांद्रे पूर्व या ठिकाणी जाऊन छापेमारी करण्यास सुरुवात केली. तसेच छांगुर बाबाचा सहकारी शहजाद याचीही चौकशी अधिकारी करण्यात येत आहे. शहजादच्या बँक खात्यांतील संशयास्पद व्यवहारांबाबत ही चौकशी सुरु आहे. पहाटे ५ वाजल्यापासून सुरू असलेल्या या छापेमारीदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यापूर्वी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (यूपी एटीएस) छांगुर बाबा आणि त्याची सहकारी नीतू यांना अटक केली होती. त्यांना सात दिवसांच्या पोलिस कोठडीत घेऊन चौकशी केली असता, अनेक महत्त्वाचे खुलासे झाले होते.
छांगुर बाबावर यापूर्वी ५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. एटीएसने या प्रकरणातील छांगुरचा मुलगा आणि नवीन रोहर यांना यापूर्वीच अटक करून तुरुंगात पाठवले आहे. एटीएसने या प्रकरणात एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात छांगुर बाबा, नीतू रोहरा, नीतूचा पती नवीन रोहरा यांच्यासह चौघांना आतापर्यंत अटक झाली आहे, तर इतर आरोपींना अटक होणे बाकी आहे.