खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना धडा शिकवा; चित्रा वाघ यांचं गृहमंत्र्यांना आवाहन

| Updated on: Jun 06, 2021 | 2:27 PM

महाराष्ट्रात लहान मुली, महिलांसोबतचं पोलीस दलात काम करणाऱ्या महिला पोलीसही लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. (chitra wagh met home minister dilip walse patil on violence against lady police)

खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना धडा शिकवा; चित्रा वाघ यांचं गृहमंत्र्यांना आवाहन
chitra wagh
Follow us on

मुंबई: महाराष्ट्रात लहान मुली, महिलांसोबतचं पोलीस दलात काम करणाऱ्या महिला पोलीसही लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. त्यामुळे या प्रकरणात स्वत: लक्ष घालून खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना तात्काळ धडा शिकवा, असं आवाहन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलं आहे. चित्रा वाघ यांनी आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत हे आवाहन केलं. (chitra wagh met home minister dilip walse patil on violence against lady police)

चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या महिला अत्याचारावर वळसे-पाटलांशी चर्चा करून त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं. तसेच महिला अत्याचार रोखण्यासंदर्भातील निवेदनही दिलं. राज्यात मुली आणि महिलांवर अत्याचार होत असतानाच आता पोलीस दलातील महिलाही अत्याचाराच्या बळी पडत आहेत. लैंगिक अत्याचार पीडितांना आपली व्यथा मोकळेपणाने मांडता यावी म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस दलात महिलांचा समावेश केला. त्यांचा हा निर्णय कितपत यशस्वी झाला आहे?, असा सवाल वाघ यांनी निवेदनात केला आहे.

ही अत्यंत शरमेची बाब

पोलीस दलातील महिलाच आज पोलीस दलातील पुरुष सहकाऱ्यांच्या अत्याचाराच्या बळी पडत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही गोष्ट शोभनीय नाही. ही अत्यंत शरमेची बाब आहे. राज्यातील आयाबहिणींचं संरक्षण करणाऱ्या पोलिसांचा आम्हाला अभिमान आहेच. पण पोलीस दलात काही विकृत पोलीस असून ते आपल्या महिल्या सहकाऱ्यांवरच अत्याचार करत आहे. या घटनांचा आलेख वाढत असून हे चित्रं भयावह आणि चिंताजनक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

अत्याचाराचा वाचला पाढा

यावेळी त्यांनी कोणत्या जिल्ह्यात महिलांवर अत्याचार झाला त्याची माहितीही दिली आहे. वाशिममध्ये महिला पोलीस शिपायावर बलात्कार केल्याप्रकरणी नांदेडच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरमध्येही दोन घटनेत पोलिसांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचं दिसून आलं आहे. मुंबईतही पोलीस अधिकाऱ्याने महिला पोलिसावर बलात्कार केल्याचा गुन्हा डोंगरी पोलीस ठाण्यात नोंद आहे. मुंबईतील एका अभियंत्याने 47 वर्षीय महिला पोलिसावर बलात्कार केला. त्यामुळे या महिला पोलिसाने पुण्यात आत्महत्या केली. सोलापुरातही महिला पोलिसाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, असं वाघ यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

तर सर्वसामान्यांचं काय होणार?

राज्यात या घटना कुठे ना कुठे होतच आहेत. राज्यातील जनतेची सुरक्षा करणाऱ्या पोलीस दलातील महिलाच जर बलात्काराच्या बळी पडत असतील तर सर्वसामान्यांचं काय होणार? असा सवाल त्यांनी केला. महिला पोलीसच सुरक्षित नसतील तर आमचं रक्षण कसं होणार? असा सवाल करतानाच तुम्ही या प्रश्नात लक्ष घालून खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना धडा शिकवा. राज्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्या, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. (chitra wagh met home minister dilip walse patil on violence against lady police)

 

संबंधित बातम्या:

मुंबईत अल्पवयीन तरुणीवर तीन ठिकाणी गँगरेप, सहा इन्स्टाग्राम फ्रेण्ड्सना अटक

मुंबईत अल्पवयीन मुलीवर तीन ठिकाणी गँगरेप, सहा इन्स्टाग्राम फ्रेण्ड्सना अटक

‘त्या’ घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी येणार असल्याचं कळवताच कोर्लईत गावबंदी; सोमय्यांचा आरोप

(chitra wagh met home minister dilip walse patil on violence against lady police)