Abhijeet Dipke: कॉकरोच संघाच्या बालेकिल्ल्यात, संविधान दिनी नागपूरमध्ये मोठा धमाका, अभिजीत दिपके यांची मोठी घोषणा
Abhijeet Dipke CJP Nagpur Samvidhan Diwas Rally: दोन दिवसानंतर नागपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टी संघाच्या मैदानात डेरेदाखल होत आहे. नागपूरमध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने सीजेपीने संविधान चौकात रॅलीचे आयोजन केले आहे.

CJP Abhijeet Dipke Nagpur Rally: दोन दिवसानंतर नागपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यात दाखल होत आहे. २६ नोव्हेंबर रोजी नागपूरमध्ये सीजेपीने संविधान चौकात भव्य रॅलीचे आयोजन केले आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत लोकशाही आणि संविधान बचाव, रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची हाक संयोजक अभिजीत दिपके यांनी दिली आहे. गुरूवारी संविधान दिनाचे औचित्य साधून ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.
भाजपवर मतचोरीचा आरोप
या रॅलीत अभिजीत दिपके सरकारव तुटून पडणार असल्याचे दिसते. त्यांनी रॅलीपूर्वीच भाजपवर गंभीर आरोपांची राळ उडवून दिली आहे. गोव्याची राजधानी पणजी येथे रविवारी, २२ नोव्हेंबर रोजी एका जाहीर सभेला दिपके यांनी संबोधित केले. या सभेतून त्यांनी राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकावर मत चोरीचा गंभीर आरोप केला.
सरकार जाणीवपूर्वक धार्मिक विभाजनाला खतपाणी घालत असल्याचा आरोपही या जाहीर सभेतून दिपके यांनी केला. त्यांनी सरकार सर्वसामान्य जनतेच्या खऱ्या प्रश्नांना बगल देत असल्याचा आरोप केला. सरकार मुद्दाम वादग्रस्त मुद्दे समोर आणून मूळ प्रश्नांना बगल देत असल्याचे ते म्हणाले. आता २६ नोव्हेंबरला ते नागपूरमध्ये सरकारवर काय घणाघात घालतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एक्स पोस्टमध्ये काय?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिपके यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात या संविधान दिनी आपण सर्वांनी एकत्र येऊयात. लोकशाहीचे रक्षण करण्याचा, संविधानाची मूल्यं जपण्याचा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूयात, असे आवाहन केले. २६ नोव्हेंबरला नागपूरमध्ये आपली भेट होईल, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
दिपके यांनी पोस्टमध्ये नागपूरमधील संविधान दिनाशीसंबंधित एक अधिकृत पोस्टरही शेअर केले आहे. त्यातून कार्यक्रमाचा संपूर्ण तपशील त्यांनी दिला आहे. कॉकरोच जनता पार्टी गुरूवारी, २६ नोव्हेंबर रोजी नागपूर शहरातील संविधान चौकात रॅली करतील. सायंकाळी ४ वाजता ही भव्य रॅली सुरू होणार आहे. या रॅलीत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन दिपके यांनी केले आहे. पोस्टमध्ये त्यांनी लोकतंत्र बचाओ, संविधान बचाओ, असा नाराही दिला आहे.