2019 नंतर उद्धव ठाकरेंनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा चिमटा
Uddhav Thackeray -Devendra Fadnavis: मुंबईतील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल विधान केले. 2019 नंतर उद्धव ठाकरेंनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो, असे ते म्हणाले.

Uddhav Thackeray -Devendra Fadnavis: मुंबईतील एक पुस्तक प्रकाशन सोहळा राजकीय चिमटे आणि कोट्यांनी गाजला. कधीकाळी सत्तेत एकत्र असलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले. त्यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा होते. दादरमधील या कार्यक्रमात राज्याच्या राजकारणापासून ते व्यंगचित्रापर्यंत अनेक मुद्यांना हाताशी घेत टोलेबाजी झाली. तीनही नेते अनेक दिवसानंतर एकाच मंचावर दिसल्याने जनतेला सुखद धक्का बसला. तर या सभागृहात शब्द कोट्यांनी हशा पिकला. सर्वच लोक डाव्या बाजूने गेले म्हणून मी जाणीवपूर्वक उजवीकडे आलो, असा मिश्किल टोला भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी लगावताच एकच हशा पिकला.
उद्धव ठाकरे यांच्या बोलवण्याची वाट बघत राहिलो…
“मगाशी आशिष शेलार असं म्हणाले की, राज ठाकरे यांनी फोन केला की देवेंद्र फडणवीस येतात. आशिषजी 2019 पर्यंत उद्धवजींनी जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा तेव्हा मी गेलो. 2019 नंतर बोलावलंच नाही. नाहीतर गेलो असतो. मी वाटच पाहत राहिलो.” असा चिमटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला. त्यांच्या या मिश्किल वक्तव्यावर सर्वांनीच खळखळून दाद दिली. तर या एका चिमट्यातून फडणवीस यांनी 2019 मधील राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
तर मुख्यमंत्र्यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही चिमटा काढला. “शेवटच्या भाषणाचा फायदा असा की राज ठाकरे उत्तर देणार नाहीत. कार्यक्रमामध्ये शेवटचं भाषण देण्याचा फायदा हा आहे की, यावर राज ठाकरे उत्तर देऊ शकणार नाहीत. त्यामुळे आजतरी मी काहीही बोललो त्यावर प्रतिषटकार येणार नाही.”
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या कार्यक्रमात तुफान बॅटिंग केली. त्यांनी व्यंगचित्र आणि या क्षेत्राविषयीच्या आठवणी जागवताना राजकीय फटकेबाजीही केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात ब्रिटनचे पंतप्रधान लॉयड जॉर्ज यांचा एक किस्सा सांगितला. त्यांनी व्यंगचित्र पाहून ते चिडून न जाता किंवा पेपर बंद करून टाक किंवा अटक न करता ते तुम्ही सकारात्मकतेने घेणे जरूरीचं असल्याचं म्हटलं. लॉयड जॉर्ज हे व्यंगचित्र पाहून स्वतःवर हसायचे, असं त्यांनीच मुलाखतीत सांगितल्याचे ठाकरे म्हणाले. तोच गुण आपणही आत्मसात करायला हवा, असं उद्धव ठाकरे यांनी मत मांडलं.