Sahil Gitte: दिवसा कॉलेज, कम्प्युटर क्लासेस आणि फुलांची विक्री; साहिलच्या संघर्षाचा रेल्वे अपघातात करुण अंत

Bhandup Train Accident: भांडुप रेल्वे अपघातात कॉलेज तरुण साहिल गिट्टेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर हळहळ व्यक्त होत आहे.

Sahil Gitte: दिवसा कॉलेज, कम्प्युटर क्लासेस आणि फुलांची विक्री; साहिलच्या संघर्षाचा रेल्वे अपघातात करुण अंत
| Updated on: Oct 26, 2026 | 10:33 PM

मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने धावत आहेत. यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. दिव्यांग डब्यात सर्वसाधारण प्रवासी चढत असल्याने दिव्यांग प्रवाशांना लोकलमध्ये चढणे-उतरणे कठीण जात आहे. तर दुसरीकडे लोकलचा खोळंबा कायम असल्याने महिला डब्याबाहेरही पुरुषांसोबत महिला प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे. अशातच एक दुर्दैवी घटना घडली आहे. भांडुप स्थानकावर रेल्वे रुळ ओलांडताना एसी लोकल ट्रेनची धडक बसून एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

मृताची ओळख साहिल गिट्टे अशी पटली आहे. शासकीय रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. कुर्ला रेल्वे पोलिसातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पडावी यांनी सांगितले की, सायंकाळी ५.३० च्या सुमारास साहिल गिट्टे प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर रेल्वे रुळ ओलांडत असताना हा अपघात झाला. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ जवळ त्यांना एका एसी लोकल ट्रेनने धडक दिली. त्याला तातडीने अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Loading...

या प्रकरणी जीआरपीने एडीआरची नोंदणी केली आहे. भांडुप रेल्वे अपघातात कॉलेज तरुण साहिल गिट्टेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळ-संध्याकाळ फुले विकून शिक्षण घेणाऱ्या साहिलचा दुर्दैवी अंत झाला आहे. कॉलेजचे शिक्षण आणि कम्प्युटर क्लासेस सांभाळत कुटुंबाला हातभार लावणारा साहिल काळाच्या पडद्याआड झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ठाण्यातील कम्प्युटर क्लास संपवून घरी परतताना साहिलला एसी लोकलची धडक बसल्याचे समोर आले आहे. कांजूरमार्गकडे जात असताना साहिल भांडुप स्थानकात उतरला होता.

रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा कुटुंबीयांनी आरोप केला आहे. तसेच अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची कुटुंबीयांनी मागणी केली आहे. मृत साहिलच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची मागणीही करण्यात आली आहे. साहिलच्या कुटुंबाला योग्य आर्थिक भरपाई देण्याची मागणी होत आहे. घरातील कमावता तरुण गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us