
मुंबईच्या घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली. घाटकोपरच्या छेडानगर येथे पेट्रोल पंपावर भलमोठं होर्डिंग कोसळलं. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. तर 57 जण जखमी झाले आहेत. बचाव कार्य अजूनही सुरुच आहे. या घटनेवर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे. “मुंबईसह उपनगरांत आलेल्या सोसाट्याच्या वादळामुळे घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपवर महाकाय होर्डिंग कोसळून त्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न मुंबई अग्निशमन दल, एनडीआरएफ पथक करीत आहेत. अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र या दुर्घटनेत काहींना दुर्दैवानं आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
“मुद्दा असा की, बेकायदेशीर होर्डिंग कोणाच्या मेहेरनजरनं त्याठिकाणी उभारण्यात आली होती आणि मुंबईत असे किती जाहिरात होर्डिंग्ज उभे आहेत. त्याचा आधी आढावा घेणं गरजेचं आहे. संबंधित दुर्घटनाग्रस्त होर्डिंग उभारण्यामागे दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली.
“दुसरीकडे रेल्वेसेवांवर देखील वादळाचा विपरीत परिणाम झाला आहे. लोकल सेवा खोळंबल्याचं चित्र आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. महामार्गावरील वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत अनेक भागांत पाणीपुरवठा सुद्धा खंडित झाल्याची माहिती मिळतेय. हवेच्या एका झोक्यानं ही अवस्था केली.
एकूणच विस्कटलेली मुंबईची घडी पुन्हा बसवण्यात या सुस्तावलेल्या सरकारला भारी पडताना दिसत आहे. विकास मॉडेलच्या बाता ठोकणाऱ्या या सरकारला आहे ती मुंबई सांभाळता येत नाही, यांचा विकास नुसता कागदावर आणि जिभेवर.. कृती यांच्यानं होणं नाही”, अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय. तसेच या प्रकरणातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय.