बागेश्वर बाबांचा मुंबईत दरबार, काँग्रेसचा तीव्र आक्षेप, नाना पटोलेंचा स्पष्ट इशारा
Bageshwar Baba Mumbai | बागेश्वर बाबा यांच्या मुंबईतील कार्यक्रमावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

मुंबई : समोरील व्यक्तीच्या मनातलं ओळखू शकतो, त्या व्यक्तीविषयी सगळीच माहिती सांगू शकतो, असे दावे करणारे बागेश्वर बाबा (Bageshwar baba) नेहमीच चर्चेत असतात. देशभरात अनेक ठिकाणी बागेश्वर बाबा दरबार लावतात, भक्तांची गर्दी गोळा होते. त्यांच्या नवनवीन दाव्यांची नव्याने चर्चा होते. आता तर बागेश्वर बांबांचा दरबार मुंबईत (Mumbai) भरणार आहे. येत्या 18 आणि 19 मार्च रोजी बागेश्वर बाबांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महापालिका निवडणूकीचे वेध आणि इतर राजकीय स्थित्यंतरामुळे मुंबईतलं वातावरण तापलेलं असतानाच बागेश्वर बाबांच्या दरबाराचं आयोजन करण्यात आलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला आहे. आम्ही बागेश्वर बाबांचा एकही कार्यक्रम मुंबईत होऊ देणार नाही, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली. यापूर्वी महाराष्ट्रात नागपुरात बागेश्वर बाबांचा दरबार भरला होता. त्यावेळीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बागेश्वर बाबांना आव्हान देण्यात आलं होतं.
काय म्हणाले नाना पटोले?
विधानभवन परिसरात नाना पटोले यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘ बागेश्वर महाराज यांचे कार्यक्रम मुंबईत होत असतील तर त्याला आमचा विरोध असणार आहे. कारण याच ढोंगी बाबाने जगात श्रेष्ठ तुकोबा महाराजांचा अपमान केला आहे. त्यामुळे या ढोंगी बाबाला कुणी समर्थन करत असेल तर ते फार चुकीचं आहे. बागेश्वर धाम महाराजांचे कोणतेच कार्यक्रम आम्ही मुंबईत होऊ देणार नाही त्याला आमचा विरोध असेल..
जय शिवाजी…जय महाराष्ट्र…. परमपूज्य सरकार महाराष्ट्र के ह्रदयस्थली ‘’मुंबई’’पधार रहे है…सनातन चेतना और हिंदूराष्ट्र के संकल्प के संग…पूज्य सरकार का दिव्य दरबार दिनाक 18-03-2023 शाम 4 बजे से….और दिव्य दर्शन और सनातन चर्चा 19-03-2023 शाम 4 बजे से…आप सभी सादर आमंत्रित है इस… https://t.co/rqE83mSshz pic.twitter.com/GVw5lqtab2
— Bageshwar Dham Sarkar (Official) (@bageshwardham) March 14, 2023
महाराष्ट्रात दुसरा दौरा
मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांचा महाराष्ट्रातील हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी नागपूरमधील कार्यक्रमावरून ते चर्चेत आले होते. बागेश्वर धामच्या ट्विटर हँडलवरूनच त्यांच्या मुंबई दौऱ्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे हृदयस्थान मुंबईत आम्ही येत आहोत. सनातन चेतना आणि हिंदुराष्ट्राच्या संकल्पासाठी संगपूज्य सरकारचा दिव्य दरबार १८ मार्च २०२३ रोजी दुपारी ४ वाजता असेल, अशी माहिती बागेश्वर धामच्या ट्विटरवरून देण्यात आली आहे. १९ मार्च रोजी बागेश्वर बाबांचे दर्शन आणि सनातनावरील चर्चा दुपारी ४ वाजेपर्यंत असेल. सर्वच नागरिकांना या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आमंत्रण या ट्विटरवरून देण्यात आलंय.
नागपुरात काय घडलं होतं?
नागपुरात बागेश्वर बाबांच्या दरबारात त्यांनी केलेल्या दाव्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी आक्षेप घेतला होता. त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रारदेखील केली होती. बागेश्वर बाबांच्या भाषणांतून अंधश्रद्धेचा प्रचार प्रसार होतोय, असा दावा श्याम मानव यांनी केला होता. मात्र पोलिसांनी बागेश्वर बाबा यांना क्लिन चिट दिली होती. बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ तपासल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलं नाही, असा निर्वाळा पोलिसांनी दिला होता.
