Bird Flu | मुंबईत चेंबूरमध्ये 9 कावळ्यांचा मृत्यू; महापालिका अ‍ॅलर्ट

| Updated on: Jan 10, 2021 | 5:20 PM

देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याने महाराष्ट्र प्रशासनही सावध झालं आहे. (Crow carcasses in mumbai spark bird flu outbreak alarm?)

Bird Flu | मुंबईत चेंबूरमध्ये 9 कावळ्यांचा मृत्यू; महापालिका अ‍ॅलर्ट
Follow us on

मुंबई: देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याने महाराष्ट्र प्रशासनही सावध झालं आहे. लातूर आणि परभणीत कोंबड्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज मुंबईत चेंबूरमध्ये 9 कावळे मेल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासन अ‍ॅलर्ट झालं असून या कावळ्यांच्या मृत्यू मागचं कारण शोधलं जात आहे. (Crow carcasses in mumbai spark bird flu outbreak alarm?)

चेंबूरच्या टाटा कॉलनी परिसरात आज दुपारी 9 कावळे मृत झाल्याचं आढळून आलं. एकाच ठिकाणी हे कावळे मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मुंबई महापालिकेला अ‍ॅलर्ट केलं. पालिकेची एक टीम घटनास्थळी दाखल होत असून मृत कावळ्यांच्या शरीरातील नमूने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाला की नक्की कशामुळे झाला याचा शोध घेण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

दुसरीकडे लातूरच्या केंद्रेवाडीत आज दुपारी 350 कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका पोल्ट्री फार्ममधील या कोंबड्या होत्या. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचली असून कोंबड्यांच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेत आहेत. दरम्यान, केंद्रेवाडीतील या पोल्ट्री फार्मच्या 5 किमी परिसरात अंडी आणि चिकन विकण्यास मनाई करण्यात आली आहे.

दापोलीत पाच कावळ्यांचा मृत्यू

देशभरात एकीकडे कोरोनाचे संकट असतानाच दुसरीकडे ‘बर्ड फ्लू’चे संकट येऊ घातले आहे. त्यामुळे एकच घबराट पसरलेली आहे. या पार्श्वभूमीवर दापोलीत पाच कावळे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दापोली नगरपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंड परिसरात अचानकपणे पाच कावळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांना मृतावस्थेत आढळून आले. तसेच नगरपंचायतीच्या पाण्याच्या टाकीजवळ आणखी एक कावळा मृतावस्थेत आढळला होता. याची माहिती नगरपंचायतीचे अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कावळे मृत पावलेल्या ठिकाणी धाव घेऊन या कावळ्यांना पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले असून त्यांचे नमुने घेऊन ते पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे सांगितले. तपासणीचा अहवाल आल्यावरच या कावळ्यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, याचे कारण स्पष्ट होईल, असे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. मुकुंद लोंढे यांनी सांगितले.

परभणीतही कोंडब्याचा मृत्यू

परभणीच्या मुरुंबा गावात शनिवारी (9 जानेवारी) एका दिवसांत तब्बल 900 कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्या. कोंबड्या अचानक मेल्यामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या गावात कोंबड्यांची खरेदी-विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला गेलाय. हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, केरळ या राज्यांत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे. माहाराष्ट्रात अजूनतरी या आजाराने पक्षी दगावल्याचे समोर आलेले नाही. असे असले तरी नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीमुळे चिकनचे भाव गडगडले आहेत. देशातील चिकन आणि अंड्याची मागणी जवळपास 60 टक्क्यांनी कमी झाली आहे. मागील आठवड्यात एका पक्षाची म्हणजेच कोंबड्याची किंमत 100 रुपये किलो होती, तिथं आता घट होऊन 60 रुपये प्रति किलो दर झाल्याचे चिकन व्यावसायिक म्हणत आहे. (Crow carcasses in mumbai spark bird flu outbreak alarm?)

 

संबंधित बातम्या:

Bird Flu | पोल्ट्री फार्म मालक आणि दुकानदारांच्या तोंडचं पाणी पळालं!

ठाण्यात आधी 16 पक्षांचा मृत्यू, आता पुन्हा गिधाडं आणि बगळे मृत सापडल्याने धाकधूक वाढली

देशातील 4 राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा कहर, उस्मानाबादेतील पोल्ट्री व्यावसायिक सावध, घेतली जातीय अशी काळजी