
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबईतील राजकारणात मोठी बातमी समरो आली आहे. ठाकरे गटाचे आधारस्तंभ आणि शिवसेनेत ५९ वर्षांचे योगदान देणारे ज्येष्ठ नेते, माजी आमदार दगडू दादा सकपाळ यांनी आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुंबईतील उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे सकाळी ११ वाजता हा ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी लालबाग-परळ या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे.
या पक्षप्रवेशानंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना दगडू दादा सकपाळ अत्यंत भावूक झाले होते. ते म्हणाले, मी आयुष्याची ५९ वर्षे एकाच घरात काढली. बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही घडलो. मात्र, गेल्या काही काळापासून तिथे निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. निर्णयप्रक्रियेत ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान उरलेला नाही. ज्या पक्षात विचारांची किंमत नाही, तिथे राहणे कठीण झाले होते. आज इथून बाहेर पडताना माझ्या छातीवर दगड ठेवावा लागला आहे, कारण हे नाते तोडणे सोपे नव्हते. पण एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत आणि इथेही धनुष्यबाणच आहे, म्हणून मी हा मार्ग निवडला, असे दगडू सकपाळ म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी दगडू दादांचे स्वागत करताना उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, आजचा दिवस शिवसेनेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. दगडू दादा हे शिवसेनेच्या पायाचे दगड आहेत. ज्यांनी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून, अंगावर लाठ्या-काठ्या झेलून शिवसेना लालबाग-परळमध्ये जिवंत ठेवली. आज त्यांनाच अपमानित होऊन पक्ष सोडावा लागत आहे. उद्धव ठाकरेंना अशा निष्ठावंतांची किंमत उरलेली नाही. जेव्हा पायाचा दगड निखळतो, तेव्हा इमारत कोसळायला वेळ लागत नाही. दगडू दादांच्या रूपाने लालबागच्या राजाचा आशीर्वाद आज आम्हाला मिळाला आहे, असे दगडू सकपाळ म्हणाले.
दरम्यान दगडू दादा सकपाळ हे लालबाग, परळ आणि शिवडी भागातील अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व मानले जातात. ५९ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे वर्चस्व राहिले आहे, मात्र सकपाळांच्या जाण्याने आता तिथे शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे. शेकडो कार्यकर्त्यांच्या या सामूहिक प्रवेशामुळे ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.