तुमचा बाबा सिद्दिकी करू, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी; 10 दिवसाचा अल्टिमेटम

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. "बाबा सिद्दीकीसारखे मारू" अशी धमकी योगींना देण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धमकी आल्याने पोलिसांनी या धमकीची गंभीर दखल घेतली असून अधिक तपास सुरू केला आहे.

तुमचा बाबा सिद्दिकी करू, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी; 10 दिवसाचा अल्टिमेटम
Yogi Adityanath
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 03, 2024 | 10:01 AM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाकडे ही धमकी देण्यात आली आहे. तुमचा बाबा सिद्दिकी करू असं धमकी देणाऱ्याने म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून कसून शोध सुरू केला आहे. तसेच उत्तर प्रदेश पोलिसांनाही या धमकीची माहिती दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा सुरू आहे. योगी आदित्यनाथ हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत, असं असताना त्यांना धमकी देण्यात आल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या नावाने मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला अज्ञात नंबरहून धमकीचा मेसेज आला आहे. योगी आदित्यनाथ यांनी येत्या 10 दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. नाही तर त्यांनाही बाबा सिद्दिकी सारखे मारू, असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. शनिवारी संध्याकाळी हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी शोध सुरू केला आहे. हा नंबर कुणाच्या नावावर रजिस्टर आहे, मेसेज कुणी केला? मेसेज करणारे मुंबईतीलच आहेत की बाहेरचे आहेत? मेसेज करणाऱ्या गुन्हेगारी टोळीशी संबंधित आहेत का? की कुणी खोडसाळपणा केलाय? याची माहिती पोलीस घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच मेसेज करणाऱ्या व्यक्तीचाही शोध घेतला जात असल्याचं सांगण्यात आलं.

योगी स्टार प्रचारक

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. आजपासून सर्वच राजकीय पक्षांच्या सभांना सुरुवात झाली आहे. प्रचारासाठी अत्यंत कमी दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपआपल्या मुलुखमैदानी तोफा रणांगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपच्या यादीत योगी आदित्यनाथ यांचं नाव स्टार प्रचारक म्हणून देण्यात आलं आहे. असं असलं तरी योगी आदित्यनाथ हे भाजपसह महायुतीच्या उमेदवारांचाही प्रचार करणार आहेत. मात्र, ही सर्व धामधूम सुरू असतानाच योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.