धनगर समाजाला आरक्षण, चर्चगेट स्थानकाला अहिल्या देवींचं नाव द्या, पडळकर यांची मागणी; मुंबईत धनगर समाजाचा ‘आक्रोश’

धनगर समाजाने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी 'आक्रोश मोर्चा' काढला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चा धडकला. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, चर्चगेट स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे आणि त्यांचे भव्य स्मारक व्हावे, तसेच वीर शिंग्रोबा धनगर यांच्या नावाने हायवेला जोडणी द्यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

धनगर समाजाला आरक्षण, चर्चगेट स्थानकाला अहिल्या देवींचं नाव द्या, पडळकर यांची मागणी; मुंबईत धनगर समाजाचा आक्रोश
gopichand padalkar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 07, 2026 | 1:13 PM

आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी आज राज्यभर धनगर समाजाचा आक्रोश मोर्चा सुरू आहे. मुंबईतही धनगर समाजाचा मोठा मोर्चा धडकला. आमदार गोपिचंद पडळकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पडळकर यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली. सर्वोच्च न्यायालयातून द्या नाही तर सरकारच्या अधिकारात द्या, पण आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे, असं सांगतानाच चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचं नाव द्या, अशी मागणी गोपिचंद पडळकर यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

मुंबईतील जिल्हाधिकारी कार्यालयावर हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीकरिता हा मोर्चा काढण्यात आला. आमदार गोपिचंद पडळकर यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. कोणत्या ना कोणत्या मार्गाने धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. आरक्षणाची सोडवणूक करा. आम्ही दोन टप्प्यात लढत होतो. रस्त्यावर आणि विधानसभेत आम्ही लढत आहोत. दुसरं म्हणजे आमची न्यायालयीन लढाईही सुरू आहे. उच्च न्यायालयात आमच्याविरोधात निर्णय गेला. हायकोर्टात सरकारने आम्हाला मदत केली. पण तरीही निकाल विरोधात गेला. त्यानंतर आमचे काही लोक सुप्रीम कोर्टात गेले. तिथेही आमची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता आम्ही नव्याने मागणी केली आहे. त्यावर सरकारला आपलं म्हणणं मांडायचं आहे, अशी माहिती गोपिचंद पडळकर यांनी दिली.

लोक जाब विचारत आहेत

सरकारने न्यायालयातून किंवा त्यांच्या माध्यमातून आरक्षण द्यावं. पण आरक्षणाची अमलबजावणी करावी. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धनगरांची बाजू मांडावी. संवैधानिक प्रक्रिया करून आरक्षण द्या. आरक्षण दिल्याशिवाय मार्ग नाही. आता लोक जाब विचारत आहेत. आंदोलन करत आहेत. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, असं पडळकर म्हणाले.

भव्य स्मारक उभारा

अहिल्या देवींचं काम देशभर आहे. त्यांनी प्रचंड सामाजिक कामे केली. चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर त्यांचं स्मारक आहे. त्यामुळे चर्चगेट रेल्वे स्थानकाला अहिल्या देवींचं नाव देण्यात यावं. तसेच त्यांचं मुंबईत भव्य स्मारकर उभारण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी केली.

शिंग्रोबा धनगर यांचं नाव द्या

इंग्रजांच्या विरोधात अनेक लोक लढले. वीर शिंग्रोबा धनगर हे त्यापैकी एक होते. शिंग्रोबा धनगर यांनी मुंबई कनेक्ट करण्यासाठी इंग्रजांना मदत केली. ते राष्ट्रभक्त होते. त्यांना इंग्रजांनी बक्षीस काय देऊ म्हणून विचारलं. त्यांनी इंग्रजांकडून बक्षीस घेतलं नाही. उलट त्यांनी इंग्रजांना आमच्या देशातून निघून जा म्हणून सांगितलं. ते ऐकून इंग्रजांनी त्यांना गोळ्या घातल्या. त्यात ते हुतात्मा झाले. पण वीर शिंग्रोबा धनगर यांचा कधीच सन्मान झाला नाही. त्यामुळे पुणे-बंगळुरू हायवेला कनेक्टिंग लिंक केली आहे. त्याला शिंग्रोबा धनगर यांचं नाव द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us