Diwali 2025: दिवाळीनिमित्त बाजारपेठा गजबजल्या, फुल मार्केटमध्ये गर्दी, सामना खरेदीसाठी नागरिकांची लगबग

राज्यभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. मुंबईतील दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आहे, फुलांच्या वाढलेल्या किमती असूनही उत्साह कायम आहे. उद्धव आणि राज ठाकरे दादर शिवाजी पार्क येथील मनसेच्या दीपोत्सवात एकत्र येत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Diwali 2025: दिवाळीनिमित्त बाजारपेठा गजबजल्या, फुल मार्केटमध्ये गर्दी, सामना खरेदीसाठी नागरिकांची लगबग
| Updated on: Oct 17, 2025 | 9:48 AM

राज्यभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. दिवाळी म्हटलं ही फराळ, सजावटीसोबत खरेदीही आलीच. यानिमित्ताने मुंबईसह राज्यभरात खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. मुंबईतील दादर फुल मार्केटमध्ये पहाटेपासूनच ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. तोरण आणि हारांसाठी लागणाऱ्या झेंडू आणि शेवंतीच्या फुलांना मोठी मागणी आहे. झेंडूचे दर वाढले असले तरी खरेदीचा उत्साह कायम आहे. यासोबतच बाजारपेठांमध्ये पणत्या, आकाशकंदील आणि सजावटीचे सामान खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. तर दुसरीकडे आज संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात एकत्र येणार आहेत.

मुंबईतील सर्वात मोठे फुलमार्केट असलेल्या दादरच्या फुलमार्केटमध्ये फुलांच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या दादर फुलमार्केट ग्राहकांनी तुडुंब भरले आहे. मुंबईसह आसपासच्या उपनगरातील नागरिकांच्या गर्दीमुळे मार्केटमध्ये अक्षरशः मुंगीलाही पाय ठेवायला जागा नाही अशी स्थिती आहे. दादरच्या फुलमार्केटमध्ये सजावटीसाठी लागणारे गुलाब, अष्टर, कामिनी आणि खास करून कमळाच्या फुलांना मोठी मागणी आहे. दिवाळीच्या आधी पडलेल्या पावसामुळे ओल्या फुलांना अर्धी किंमत मिळत आहे, तर सुटलेल्या फुलांना चांगला भाव मिळत आहे.

दिवाळीनिमित्त मुंबईचे डबेवाले येत्या २० ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवसांसाठी रजेवर जाणार आहेत. बहुतेक डबेवाले मावळ भागातील असून त्यांनी घरी जाण्याचा बेत आखला आहे. या पाच दिवसाचा पगार कापू नये आणि बोनस द्यावा अशी मागणी डबेवाल्यांकडून करण्यात आली आहे. यावर्षी पहिल्यांदाच दिवाळीनिमित्त पाच दिवस सुट्टी घेतली आहे.

तसेच आज दादरच्या शिवाजी पार्कात मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे यांची देखील उपस्थिती असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित कार्यक्रमांमध्ये एकत्र येत आहेत. त्यामुळे या दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय युती कधी होणार याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सध्या दादर मधील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात दीपोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आज संध्याकाळी दोन्ही ठाकरे बंधूंच्या हस्ते या दीपोत्सव कार्यक्रमाच उद्घाटन होणार आहे.

तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून कलानगर, खार-सांताक्रुझ परिसरात ६० हजार उटण्याचे वाटप सुरू आहे, ज्यावर यंदा मुंबई मनपात महापौर शिवसेनेचा असा आशय पाहायला मिळत आहे. तसे लक्ष्मीपूजनासाठी महत्त्वाचे असणाऱ्या बत्ताशांची निर्मिती येवला शहरात जोमात सुरु आहे. यंदा इलायचीसह विविध फ्लेवरचे बत्ताशे बाजारात आणण्यात आले आहेत.