राज ठाकरे-उद्धव ठाकरे आज पुन्हा एकाच व्यासपीठावर, निमंत्रण पत्रिकेत खास उल्लेख, वेळ, स्थळही ठरलं!

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा आहे. मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीने या चर्चांना बळ मिळाले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येत आहेत.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे आज पुन्हा एकाच व्यासपीठावर, निमंत्रण पत्रिकेत खास उल्लेख, वेळ, स्थळही ठरलं!
| Updated on: Oct 17, 2025 | 11:12 AM

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या युतीबद्दलची सातत्याने चर्चा सुरु आहे. त्यातच आता दिवाळीच्या निमित्ताने या चर्चांना आणखी बळ मिळाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावर्षी या दीपोत्सवाचे उद्घाटन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंमध्ये सातत्याने भेठीगाठी वाढत आहेत. या दोन्ही ठाकरे बंधू आज (१७ ऑक्टोबर) संध्याकाळी एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण आहे. दादरमधील गोखले रोड परिसरात दीपोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शिवाजी पार्कच्या परिसरात मनसेच्या युवासेना कार्यकर्त्यांकडून लावण्यात दिवाळीच्या निमित्ताने मोठमोठे आकाश कंदील लावण्यात आले आहेत.

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार

या दिवाळी शुभेच्छांच्या आकर्षक आकाश कंदिलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, या कंदिलांवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे एकत्रित फोटो झळकत आहेत. या माध्यमातून मनसे कार्यकर्त्यांनी एकप्रकारे शक्तीप्रदर्शन करत ठाकरे कुटुंबाची एकी दाखवून दिली आहे. दरवर्षी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री उपस्थित राहत असलेल्या मनसेच्या या महत्त्वपूर्ण दीपोत्सवाचे उद्घाटन यंदा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याने याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत असल्याने आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय युतीची घोषणा होणार का, याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला कंदिलांची रोषणाई

गेल्या काही महिन्यांपासून हिंदी सक्तीविरोधातील एकत्र भूमिका असो किंवा एकमेकांच्या घरी कौटुंबिक भेटीगाठी यामुळे ठाकरे बंधूंमधील जवळीक वाढताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी नुकतेच मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता दीपोत्सवाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते जाहीरपणे एकत्र येत असल्याने दिवाळीत राजकीय धमाका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे मनसेने प्रकाशित केलेल्या निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा केला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व वाढले आहे. दीपोत्सवाच्या या निमित्ताने ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला कंदिलांची रोषणाई मिळाली असून, महाराष्ट्राचे लक्ष आजच्या कार्यक्रमाकडे लागले आहे.