धनंजय मुंडेंना संरक्षण द्या, तातडीने राजीनामा घेऊ नका; राऊतांची मागणी

| Updated on: Jan 15, 2021 | 3:50 PM

धनंजय मुंडे प्रकरणाच्यानिमित्ताने हनीट्रॅपचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कायद्याचा अशाप्रकारे दुरुपयोग करणाऱ्या एक नव्हे अनेक प्रवृत्ती आहेत. | Sanjay Raut

धनंजय मुंडेंना संरक्षण द्या, तातडीने राजीनामा घेऊ नका; राऊतांची मागणी
संजय राऊत
Follow us on

मुंबई: धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची आणखी खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज आहे. गेल्या काही तासांत या प्रकरणाला गंभीर आणि धक्कादायक वळण लागले आहे. ही सगळी परिस्थिती पाहता धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घेऊ नये, असे माझे मत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. (Sanjay Raut backs Dhananjay Munde)

ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. धनंजय मुंडे यांच्यावर ज्या महिलने आरोप केले आहेत, तिच्यावरच इतर व्यक्तींकडून गंभीर आरोप करण्यात आल्याचे आता समोर आले आहे. हे खूपच धक्कादायक आहे. अशा प्रवृत्तीला उत्तेजन मिळू नये म्हणून याप्रकरणाची आणखी खोलात जाऊन चौकशी होण्याची गरज संजय राऊत यांनी व्यक्त केली.

‘महाराष्ट्राच्या राजकारणात हनीट्रॅपचा शिरकाव ही गंभीर बाब’

धनंजय मुंडे प्रकरणाच्यानिमित्ताने हनीट्रॅपचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कायद्याचा अशाप्रकारे दुरुपयोग करणाऱ्या एक नव्हे अनेक प्रवृत्ती आहेत. यापूर्वी हनीट्रॅप हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हता. पण गेल्या वर्षभरात चिखलफेक आणि बदनामीचं राजकारण वाढलं आहे. मात्र, यामुळे फक्त व्यक्तीच नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचीही बदनामी होत आहे. अशा प्रवृत्तींचा बिमोड व्हायला पाहिजे, संजय राऊत यांनी म्हटले.

हमाम मे सब नंगे होते है; राऊतांचा विरोधकांना इशारा

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत. अन्यथा एक दिवस त्यांचेही घर फुटेल. बेताल वागणाऱ्या विरोधी पक्षांनी संयम ठेवला पाहिजे. आपण कधीकाळी राज्यकर्ते होतो, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. ‘हमाम मे सब नंगे होते है’, ही गोष्ट लक्षात ठेवा, असा इशारा संजय राऊत यांनी विरोधकांना दिला.

‘धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही’

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप प्रकरणा संबंधित सतत सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शरद पवार यांना धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाल्याशिवाय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.

“राजीनामाचा विचार करण्याची गरज आहे की नाही यात मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्याबाबत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाहीतर कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा, अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे त्याची सत्यता पुढे यावी”, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या:

Dhananjay Munde case | धनंजय मुंडेंसाठी फडणवीसांची ढाल; पवारांकडून भाजपची कोंडी

Dhananjay Munde case | शरद पवारांचा सूचक इशारा, तरीही धनंजय मुंडेना राष्ट्रवादीकडून अभय?

मुंबई पोलिसांवर विश्वास, ते मुंडे प्रकरणाचा योग्य तपास करतील : शरद पवार

(Sanjay Raut backs Dhananjay Munde)