Sharad Pawar : शरद पवार यांचा फोटो वापरायचा की नाही?, अजितदादा गटाच्या सूचना काय?; शेवटचा दोरही कापला?

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी अजितदादा गटाला फोटोच्या मुद्द्यावरून चांगलाच दम भरला आहे. माझा फोटो कोणत्याही बॅनर्सवर वापरू नका, नाही तर कोर्टात खेचीन असं शरद पवार म्हणाले होते.

Sharad Pawar : शरद पवार यांचा फोटो वापरायचा की नाही?, अजितदादा गटाच्या सूचना काय?; शेवटचा दोरही कापला?
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 24, 2023 | 1:14 PM

मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : बॅनर्स, पोस्टर्स आणि होर्डिंग्जवर माझा फोटो जर वापरला तर मी कोर्टात खेचेन, असा इशारा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजितदादा गटाला दिला होता. शरद पवार यांच्या या इशाऱ्याची अजितदादा गटाने गंभीर दखल घेतली आहे. शरद पवार यांचा फोटो कुमीही वापरू नये, अशा सूचनाच अजितदादा गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. कार्यकर्त्यांवर कोर्टबाजी करण्याची वेळ येऊ नये म्हणून या सूचना देण्यात आल्या आहेत. शरद पवार यांचा फोटो न वापरण्याच्या सूचना देऊन अजितदादा गटाने आता शरद पवार गटाबरोबरच्या संवादाचा शेवटचा दोरही कापल्याची जोरदार चर्चा आहे.

योगेश क्षीरसागर यांनी काल अजितदादा गटात प्रवेश केला. यावेळी स्टेजवर मोठा बॅनर्स लावण्यात आला होता. पण त्यावर शरद पवार यांचा फोटो नव्हता. त्यामुळे चर्चा रंगली होती. शरद पवार यांच्यापासून अजितदादा गटाने आता पूर्णपणे फारकत घेतल्याचंही सांगितलं जात होतं. बीडच्या सभेचाही अजितदादा गटाचा टीझर आला आहे. त्यातही शरद पवार यांचा फोटो नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडमधील सभेत शरद पवार यांच्यावर थेट टीका करणार की अनुल्लेख टाळणार याकडे सर्वांंचं लक्ष लागलं आहे.

भंडाऱ्यात बॅनर्सवर पवार

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवाह हेच आमचे दैवत असल्याचं पुन्हा एकदा म्हटलं आहे. शरद पवार आमचे दैवत आहेत. मी पवारांना सदैव मानणारा माणूस आहे. आजही आणि उद्याही मी त्यांना मानणारा आहे. पवार साहेबांबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. पवारांबद्दल ना विरोधात बोललं पाहिजे, ना त्यांच्या विरोधात ऐकलं पाहिजे. त्यांच्याबाबतची चर्चा कुठेही करू नये. जर कोणी चुकीची चर्चा करत असेल तर त्यांना तिथेच थांबविले पाहिजे, असं प्रफुल पटेल म्हणाले. भंडारा येथील कार्यकर्ता मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या फोटोसह मोठ्या प्रमाणात बॅनर लावलेत याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

पवार कुटुंबासाठी घराचे दरवाजे सदैव उघडे

आमदार रोहित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याची निरीक्षकपदाची जबाबदारी दिली आहे. याबाबत खासदार प्रफुल पटेल यांना विचारण्यात आलं. त्यावर, रोहित पवार यांचे मनापासून स्वागत आहे. पवार कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला आमच्या जिल्ह्यात आल्यानंतर माझे घर, माझ्या घराचा दरवाजा नेहमी त्यांच्यासाठी उघडा आहे. माझ्या घरी येऊन जेवण करावं, थांबावं, जसं त्यांना योग्य वाटेल तसं करावं. राजकारण राजकारणाच्या जागेवर, त्यांनी बाहेर जाऊन माझ्याविरुद्ध भाषण केलं तरी मला चालेल, अशी प्रतिक्रियाही पटेल यांनी व्यक्त केली.