
मुंबईः तुम्ही अचानक ट्रॅक बदलण्याचे कारण काय, असा रोकडा सवाल बुधवारी मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना केला आहे. भुजबळ मुंबईत बोलत होते. ते म्हणाले की, अचानक तुम्ही ट्रॅक का बदलले याचे उत्तर काल दिले नाहीत. ईडीने बोलावले तर परत जाईन म्हणालात. मात्र, आता तुम्ही भावाच्याच सरकारवर टीका करण्याचे एवढे मोठे काम करत असल्याने ईडी तुम्हाला बोलावणार नाही, असा चिमटाही काढला. राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याला शिवाजी (Shivaji) पार्कवर सभा घेतली. यावेळी त्यांनी भोंग्याचा मुद्दा उचलला. त्यावर छगन भुजबळ यांनी टीका केली होती. राज ठाकरे यांनी ठाण्यातील कालच्या भाषणात भुजबळांसहीत त्यांच्यावर टीका करणाऱ्या सर्व नेत्यांचे नाव घेऊन समाचार घेतला. भुजबळ साहेब तुमचे सीए, तुमच्या माणसामुळे केलेल्या कामामुळे तुम्हाला आत जावं लागलं. मोदींवरील टीकेवरून नाही जावं लागलं. दोन अडीच वर्ष तुरुंगात काढल्यानंतर पहिला शपथविधी यांचा कसा होतो? असा सवाल केला होता. याला भुजबळ यांनी आज उत्तर दिले.
भुजबळ म्हणाले की, माझ्यावर संस्थेमुळे ईडी लागल्याचे राज म्हणाले. मात्र, महाराष्ट्र सदन आणि इतर संस्थेमुळे ईडी वगैरे लागत नाही. राज यांनी शरद पवार छत्रपती शिवरायांचे नाव घेत नाहीत, असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना भुजबळ म्हणाले, पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात. राज यांनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची कारकीर्द आठवावी. लिखाण आठवावे. ते फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालवायचे. समता, सामजिक क्रांतीचे काम फुले, शाहू, आंबेडकरांनी केले. त्यामुळे त्यांचे नाव घेतले जाते, असा उल्लेखही त्यांनी केला.
छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ काहीवेळापूर्वीच शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्या हातात एक कागद होता. तसेच ते एकटेच शिवतीर्थावर आले आहेत. पंकज भुजबळ हे शिवतीर्थावर येण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. ही भेट पूर्वनियोजित होती का हे सुद्धा समजू शकले नाही. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कालच राज ठाकरे यांनी भुजबळांवर टीका केली होती. त्यानंतर आज थेट पंकज भुजबळ हे राज यांच्या भेटीला आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.