समाधान सरवणकर ते जय कुडाळकर… थोडक्यात संधी हुकली; शिंदे गटात कोणाकोणाचा निसटता पराभव? आकडेवारी समोर

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील त्या उमेदवारांची माहिती दिली आहे ज्यांचा अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभव झाला. समाधान सरवणकर आणि जय कुडाळकर यांच्यासह इतर नेत्यांच्या पराभवाची नेमकी आकडेवारी येथे पहा.

समाधान सरवणकर ते जय कुडाळकर... थोडक्यात संधी हुकली; शिंदे गटात कोणाकोणाचा निसटता पराभव? आकडेवारी समोर
eknath shinde
| Updated on: Jan 22, 2026 | 7:49 AM

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे (BMC Election 2026) निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला (शिंदे गट) अपेक्षित यश मिळालेले नाही. यावरून शिवसेनेने आता भाजपवर असहकार्याचे गंभीर आरोप केले असून, अनेक दिग्गज नेत्यांचा झालेला निसटता पराभव हा चर्चेचा विषय ठरला आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने सत्ता स्थापनेचा आकडा गाठला आहे. मात्र शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेने आपल्या कमी स्ट्राईक रेटसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या असहकार्याला जबाबदार धरले आहे. विशेषतः दक्षिण मुंबई आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पक्षाच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभव झाला आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांना दादर-प्रभादेवी (वॉर्ड १९४) मधून अवघ्या ६०३ मतांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

यामुळे समाधान सरवणकर यांनी थेट भाजपवर आरोप केले आहेत. स्थानिक पातळीवर भाजपने अपेक्षित मदत केली नाही, उलट व्हॉट्सअ‍ॅपवरून माझ्या विरोधात प्रचार करण्यात आला, असा आरोप समाधान सरवणकर यांनी केला आहे. त्यातच शिंदे गटाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, त्यांचे ११ उमेदवार १,००० पेक्षा कमी मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत. हे उमेदवार निवडून आले असते, तर महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ लक्षणीय वाढले असते.

अत्यंत कमी फरकाने पराभूत झालेले प्रमुख उमेदवार

उमेदवार वॉर्ड क्रमांक पराभवाचे अंतर (मते)
प्रतिमा खोपडे १२१ १४ मते
मनाली भंडारी ३२ ८४ मते
अश्विनी बाबा हांडे १२८ १५८ मते
प्रिया गुरव-सरवणकर १९१ १९७ मते
प्रिया पाटील २२३ ४६७ मते
मानसी पावसकर ४१ ५९६ मते
समाधान सरवणकर १९४ ६०३ मते
सुप्रिया मोरे ७५० मते
पुष्पा कोळी ८३९ मते
शोभा जयाभाये ९४३ मते
जय कुडाळकर ९७० मते

मित्रपक्षाच्या साथ न लाभल्याने पराभव

शिवसेनेच्या नेत्यांच्या मते, मुस्लिमबहुल भागात जाणीवपूर्वक लढायला लावणे आणि त्या भागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही रसद न पुरवणे, हे पराभवाचे मुख्य कारण आहे. भाजपने शिवसेनेचा स्ट्राईक रेट कमी असल्याची टीका केली होती. मात्र शिवसेनेने या आकडेवारीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे की, पक्ष कमकुवत नसून मित्रपक्षाच्या साथ न लाभल्याने जागा हातातून गेल्या आहेत.