
मुंबई | 18 मार्च 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयुक्त इक्बाल सिंह यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांनाही हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने फक्त मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले नाहीत तर देशातील 6 राज्यांच्या गृह सचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांमधील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी त्यांच्या X अकाउंटवरुन व्हिडीओ ट्वीट केलाय. या व्हिडीओत त्यांनी इक्बाल सिंह चहल यांची बदली झाल्याची माहिती दिली आहे. “निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची ताबोडतोब बदली करण्यात यावी, असे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. मी त्याचे स्वागत करत आहे”, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालकांना हटवण्यासाठी आवश्यक कारवाई केली आहे. ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ तीन वर्ष पूर्ण झाला आहे किंवा ते त्यांच्या गृह जिल्ह्यांत कार्यरत आहेत त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, असा आदेश निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना दिला आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने नव्या पोलीस महासंचालकांसाठी तीन नावे पाठवली आहेत. यामध्ये संजय मुखर्जी, रणवीर कुमार आणि डॉ. राजेश कुमार यांची नावे आहेत. या तिघांपैकी एका पोलीस अधिाऱ्याला पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
दरम्यान, देशात लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. देशभरात एकूण 7 टप्प्यात निवडणूक पार पडत आहे. यातील पहिला टप्पा हा 19 एप्रिल, दुसरा 26 एप्रिल, तिसरा 7 मे, चौथा 13 मे, पाचवा 20 मे, सहावा 25 मे आणि सातवा टप्पा 1 जूनला असणार आहे. यानंतर 4 जूनला मतमोजणी होणार आहे.