
मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या मर्मस्थळावर पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी हल्ला करून नरसंहार घडविला होता. या घटनेला आज पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. अजमल कसाबसह लश्कर-ए-तोयबा या जहाल पाकिस्तानी अतिरेकी संघटनेनच्या दहा अतिरेक्यांनी सीएसएमटी स्टेशन, कामा हॉस्पिटल, लिओपोल्ड कॅफे, ताज, हिल्टन टॉवर, ज्यूंचे धार्मिक स्थळ छाबड हाऊस आदी ठिकाणी नृशंस हल्ला करीत 18 सुरक्षा अधिकारी, 164 नागरिकांना ठार केले होते तर 300 हून अधिक लोकांना जखमी केले होते. या हल्ल्यानंतर भारताच्या सुरक्षा यंत्रणेत आमुलाग्र बदल झाला. 26/11 हल्ल्यानंतर भारताने असे निर्णय घेतले की ज्यामुळे भारताची संपूर्ण व्यवस्था बदलली.
मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यानंतर सरकार आणि देशाचे धोरण ठरविणाऱ्यांना निर्णय घ्यावे लागले. या हल्ल्यानंतर भारतीय अधिकारी आणि नेत्यांच्या मुत्सद्दीगिरीमुळे आज पाकिस्तानची छबी जगात दहशतवादाचा पाठीराखा म्हणून झाली आहे. पाकिस्तानाच्या कपाळावर लागलेला हा डाग लवकर पुसता येणारा नाही. पाकिस्तानी आर्थिक रुपाने संपूर्ण ढासळला आहे. गेल्या 15 वर्षांपासून पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. 26/11 हल्ल्यानंतर भारतीयांनी सुरक्षा वाढविली. समुद्री सुरक्षेत वाढ करण्यात आली. देशातील गुप्तचर यंत्रणा दक्ष करण्यात आली. अतिरेक्यांचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एनआयए सारखी संस्था स्थापन केली.
दुसरीकडे भारत अर्थव्यवस्था टॉप 5 मध्ये आली आहे. 10 नोव्हेंबर 2023 रोजी प्रकाशित फोर्ब्सच्या अहवालानूसार भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. हाच वेग राहीला तर भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल. आज भारताचे रशियाशी संबंध कायम असूनही अमेरिका आणि अन्य पाश्चात्य देशांशी जवळीक बनली आहे. गेल्या दशकात भारताची आर्थिक आणि सामरिक ताकद वाढली आहे.
अमेरिकेवर 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेला स्वत:ला दहशतवादी झळ पोहचली. 9/11 ची जी जखम अमेरिकेने 22 वर्षांपूर्वी सहन केली तशीत जखम मुंबईला 26/11 च्या हल्ल्यात झाली आहे. त्यामुळे अमेरिकेने देखील पाकिस्तानबद्दलचे आपले धोरण बदलले. मुंबईवरील 26/11 वरील हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तान आणि दहशतवाद विरोधात प्रचंड आक्रोश होता. 1980 ते 2020 च्या दशकात भारताला दहशतवादाचा सामना करावा लागला. दहशतवादामुळे देशाचे दोन पंतप्रधान गमवावे लागले आहेत. जम्मू – काश्मीर आणि पंजाब दहशतवादाचा सामना करावा लागला. यामागेही पाकिस्तान प्रायोजित दहशतवादच कारणीभूत आहे.
26/ 11 हल्ल्याचे पुरावे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने असे ठेवले की त्यामुळे पाकिस्तानची नाच्चकी जगभरात झाली. परंतू भारताला जगभरातून पाठिंबा मिळाला आहे. या हल्ल्यात सात देशांचे नागरिक ठार झाल्याने जगभराला दहशतवादाची झळ बसली आहे. पाकिस्तानी आयएसआय ही गुप्तहेर संघटना आणि पाकिस्तानातील सैन्याचा या मुंबईतील हल्ल्यात सामील होती असे पुरावे जगभरासमोर आले. उरी, पठाणकोट आणि पुलमावा सारख्या हल्ल्यातही पाकिस्तानविरोधातील पुरावे भारतीय सरकारने दिले असून पाकिस्तानचा हात उघड केला आहे. यापूर्वी पाकिस्तान अतिरेकी हल्ले केल्यानंतर आपण स्वत:ही दहशतवादाचा बळी असल्याचा बचाव घेत असायचा. मात्र, आता अशी पळवाट पाकिस्तान घेता येत नाही.