
मुंबईतील मलबार हिलजवळील कोस्टल रोड बोगद्यात अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. एका १८ वर्षीय मुलाने एका फॅशन इन्फ्लुएंसरच्या कारला धडक दिली. या अपघातात फॅशन इन्फ्लुएंसर महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोस्टल रोडवरील बोगद्याच्या गेट क्रमांक ८ जवळ रविवारी रात्री १० वाजेच्या जवळपास अपघात झाला. तक्रारदार महिला प्रभादेवीहून मरीन ड्राइव्हकडे जात होती. बोगद्याच्या गेट क्रमांक ८ जवळ एका भरधाव कारने तिच्या गाडीला मागून धडक दिली. या अपघातात त्या महिलेला दुखापत झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, ती महिला आठ महिन्यांची गर्भवती आहे.
आरोपीचे नाव व्योम मनीष पोद्दार असे आहे. तो १८ वर्षांचा आहे. त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवानाही आहे. त्याने बोगद्यात मागून इन्फ्लुएंसरच्या गाडीला धडक दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात झाला आणि इन्फ्लुएंसर महिला जखमी झाली. अपघातानंतर महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. आता तिची प्रकृती चांगली आहे.
फॅशन इन्फ्लुएंसरने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोद्दारविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम २८१ आणि १२५ (अ) अंतर्गत निष्काळजीपणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पुढील चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडण्यासाठी बांधण्यात आलेल्या कोस्टल रोडचा पहिला पार्ट ११ मार्च २०२४ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर दुसरा पार्ट २६ जानेवारी २०२५ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्यांमुळे हे अपघात झाले आहे.