
पहिल्याच पावसाने मुंबई लोकलला फटका बसला आहे. या पावसाने गेले दोन तास उपनगरात दाणादाण उडविली आहे.कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. ठाणे आणि कल्याण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने लोकल ट्रेनला ही फटका बसला आहे. कोकणात विलावडे स्थानका दरम्यान रुळांवर झाड कोसळल्याने रेल्वे सेवेलाही फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेच्या लोकलही रेंगाळल्या आहेत.
मुंबईत रात्री पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने मुंबईकरांची कामावरुन घरी जाताना चांगलीच त्रेधातिरपिट उडाली आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या लोकल सेवेला याचा फटका बसला आहे. तर कोकणात विलावडे स्थानका दरम्यान ट्रॅकवर झाड कोसळल्याने लांबपल्ल्याची वाहतूक ठप्प झाली होती. या पावसाचा राज्यातील अनेक ठिकाणच्या जनजीवनावर परिणाम झाला आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस शुरु आहे. सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पवई जलवायु विहार भागात झाड कोसळली आहेत. अंधेरी सब वेत पावसाचे पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होतीत दोन ते तीन तासांतील पावसाने मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रात्री उशीरा अंधेरी सबवेतील पाण्याचा निचरा झाल्याने हा सब वे वाहतूकिसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शनिवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि महाराष्ट्राच्या इतर अनेक भागांसाठी पिवळा इशारा जारी केला होता.यातच सायंकाळनंतर मुंबईच्या उपनगर आणि कोकण परिसरात जोरदार पावसाने दाणादाण उडाली आहे. १७ मे ते २१ मे २०२५ दरम्यान विजांसह वादळ, मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. कोकण प्रदेशाबाहेरही हा इशारा देण्यात आला होता. पुढील चार दिवसांसाठी, उर्वरित महाराष्ट्रातही यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. आणि राज्यभरात पावसाळी ढगाची गर्दी होईल असे म्हटले आहे.
मुंबई कोकण सह राज्यात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. ठाणे, कल्याण, बदलापूरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. पुण्यातील फातिमानगर परिसरात स्वारगेट हडपसर मुख्य रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. गेल्या तासभरापासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा ही खंडित झाला आहे. अनेक ठिकाणांवरील रस्त्यावरती पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
देशात वेळेआधी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. तिरुवनंतपुरम आणि केरळसह संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यामुळे आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताच्या हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन पुढील चार ते पाच दिवसांत केरळमध्ये होण्याची शक्यता वर्तवली आहे. नेहमीच्या १ जूनच्या तारखेपूर्वीच हे आगमन होणार असल्याने यंदा पावसाची लवकर सुरुवात होण्याची शक्यता आहे.हा अंदाज जर खरा ठरला तर २००९ नंतर (जेव्हा २३ मे रोजी पावसाने आगमन केले होते) भारतीय उपखंडावर मॉन्सूनचे हे सर्वात लवकर आगमन ठरणार आहे.