चक्री पाळण्यात बसलेल्या चिमुकलीचा तोल गेला, खाली पडून जागीच मृत्यू

| Updated on: Jun 06, 2019 | 10:35 AM

मुस्कान मोहम्मद शमीम सिद्दिकी असे मुलीचे नाव असून, या अपघाताच्या दुर्दैवी घटनेनंतर चक्री पाळणाचालक पसार झाला आहे.

चक्री पाळण्यात बसलेल्या चिमुकलीचा तोल गेला, खाली पडून जागीच मृत्यू
Follow us on

भिंवडी : रमजान ईद म्हटलं की लहानग्यांची चंगळ, घरातील वडीलधाऱ्यांकडून ,नातेवाईकांकडून मिळालेल्या ईदीरुपी बक्षिसाच्या रकमेतून आनंदमेळ्यात चक्री पाळण्यात खेळण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलीचा चक्री पाळण्यातून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मुस्कान मोहम्मद शमीम सिद्दिकी असे मुलीचे नाव असून, या अपघाताच्या दुर्दैवी घटनेनंतर चक्री पाळणाचालक पसार झाला आहे.

रमजान ईद म्हणजे मुस्लिम धर्मियांची जणू ‘दिवाळी’. खास करुन लहान मुले-मुली नवीन कपडे घालून या सणाचा आनंद घेत असताना, लहान मुलांना मोठ्यांकडून ईदीच्या रुपाने बक्षिसी रक्कम मिळते. मग ही रक्कम घेऊन लहानग्यांचा मोर्चा वळतो तो खाऊ खाण्याकडे आनंद मेळ्यात खर्च करण्याकडे.

भिवंडी शहरातील रामेश्वर मंदिर परिसरातील झोपडपट्टीत राहणारी मुस्कान मोहम्मद शमीम सिद्दिकी ही नऊ वर्षांची मुलगी आपल्या चुलत बहिणींसोबत समदनगर बगीचा येथील आनंद मेळ्यात दुपारी एक वाजता गेली .तेथील हाताने फिरविल्या जाणाऱ्या चक्री पाळण्यात ती बसल्यावर ती वर गेली असता, तिचा घाबरुन तोल गेला व ती खाली पडत असताना पाळण्यातील इतर दालनावर आदळून तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. मुस्कान जखमी रक्ताच्या थारोळ्यात पडली असता चक्री पाळणा चालवणऱ्याने तेथून पलायन केले.

या दुर्घटनेनंतर मुलांनी घरी येऊन मुस्कानच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली असता, त्यांनी घटनास्थळी धाव घेत आपल्या जखमी मुस्कानला स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारा करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांनी ती मयत झाल्याचे जाहीर केले.

त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात या घटनेची अपघाती मृत्यू म्हणुन नोंद करण्यात आली असून, चक्री पाळणा चालकाने खबरदारी घेत तात्काळ पाळणा थांबवला असता,अथवा तिला वैद्यकीय मदत उपलब्ध करुन दिली असती, तर आपली मुलगी बचावली असती. तिच्या मृत्यूस पाळणा चालकाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप मुस्कानचे वडील मोहम्मद शमीम सिद्दिकी यांनी केला आहे.