बोरिवलीतील नुकसानग्रस्त दुकानांचे त्वरित पंचनामे करून व्यापाऱ्यांना दिलासा द्या; प्रविण दरेकरांचे निर्देश

| Updated on: Jul 19, 2021 | 6:47 PM

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज बोरिवलीतील या नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या दुकानांच्या नुकसानीची पाहणी केली.

बोरिवलीतील नुकसानग्रस्त दुकानांचे त्वरित पंचनामे करून व्यापाऱ्यांना दिलासा द्या; प्रविण दरेकरांचे निर्देश
Pravin Darekar
Follow us on

मुंबई : शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे बोरिवलीतील अनेक भागांत कंबरेभर पाणी साचले होते. बोरिवली पूर्व येथील शांतीवन परिसरातील व्यापारी व घरांना याचा फटका बसला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज बोरिवलीतील या नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या दुकानांच्या नुकसानीची पाहणी केली. तेथील रहिवाशांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच बोरिवलीतून जाणाऱ्या मिठी नदीचीदेखील पाहणी केली. व्यापाऱ्यांचे नुकसान भरून देण्यासाठी त्यांच्या दुकानाचे त्वरित पंचनामे करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश त्यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. (Give relief to traders by doing immediate panchnama of the damaged shops in Borivali; Pravin Darekar orders)

दरेकर म्हणाले की, अतिवृष्टीमुळे बोरिवलीतील मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. नदीकाठी वसलेले शांतीवन परिसर, श्रीकृष्णनगर दरवर्षी जलमय होतात, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना दरवर्षी प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असते. आजही नदीकाठी असलेल्या अनेक झोपडपट्ट्या, सोसायटी आणि दुकानांमध्ये पाणी साचले असून नांगरिकांसहित व्यापाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच लॉकडाउनमुळे व्यापारी निराश झाला आहे. त्यात आता मुसळधार पावसामुळे असे नुकसान झाल्यामुळे व्यापारी खचला जाणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

नॅशनल पार्कमधील प्रलंबित पुलाचे काम लवकरात लवकर करा

नॅशनल पार्कमधील प्रलंबित पुलावरून दरेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आणि मनपा अधिकाऱ्यांना खडसावले. पुलाचे काम लवकर लवकर पूर्ण करा, असे निर्देश मनपा अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. तसेच अतिरिक्त आयुक्त वेलारासूंसोबत बैठक घेणार असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, मागाठाणे भाजप अध्यक्ष दिलीप उपाध्याय, विक्रम चौगुले, हेमचंद्र नार्वेकर, संजय शिरवडकर, वॉर्ड अध्यक्ष संजय मोरे, लक्ष्मण कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नॅशनल पार्कमधील नदीला पूर, उल्हास नदीही ओव्हर फ्लो

मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने प्रचंड थैमान घातलं आहे. गेल्या 24 तासात तर पावासाने रौद्र रुप धारण केलं आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. काही भागात घरांमध्ये, सोसायटीत तर कुठे चाळींमध्ये पाणी शिरल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. शहराशहरांमध्ये रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी बघायला मिळतंय. ठाण्याच्या शिळफाटा किंवा मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. काही महामार्गांवर दरड कोसळल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. पावसामुळे मुंबई भोवतीच्या जवळपास सर्वच नद्या तुडुंब वाहताना दिसत आहेत. पाऊस जर असाच सुरु राहिला तर पुढचे काही तास हे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आव्हानाचे राहतील. सुदैवाने पाऊस थांबला तर पावसाचा निचरा होऊन परिस्थिती नियंत्रणात येईल.

संबंधित बातम्या 

Maharashtra Rain Update : कोकण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट, कोकणात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, मुसळधार सुरुच

Mumbai Rains Live Updates | बोरिवली परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, रस्ते जलमय

(Give relief to traders by doing immediate panchnama of the damaged shops in Borivali; Pravin Darekar orders)