चोरी केली म्हणून नव्हे, चोरी केली नाही म्हणून हत्या

चोरी केली म्हणून नव्हे, चोरी केली नाही म्हणून हत्या

मुंबई : ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, चोरी केली म्हणून नाही तर चोरी का केली नाही म्हणून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ‘नाम’ या हिंदी सिनेमात एक डायलॉग आहे. ‘गुन्हेगारीच्या वाटेवर आल्यानंतर त्यातून परत जाता येत नाही, हा वन वे आहे.’ असचं काहीसं या व्यक्तीसोबत झालं. फकीर मोहम्मद उर्फ सरफराज असे या हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत फकीर मोहम्मद उर्फ सरफराज राहायचा. तो बस आणि रेल्वे मधून पाकीट मारी आणि चोरी करायचा. एकदा पाकीट चोरत असताना पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली आणि सरफराज थेट तुरुंगात पोहोचला. तुरुंगातून शिक्षा भोगून जेव्हा तो बाहेर आला, तोपर्यंत त्याची मुले मोठी झालेली होती. त्यामुळे त्याला त्याच्या कृत्यांवर पश्चाताप झाला. आता मात्र चोरीच्या धंद्यातून बाहेर पडून सामान्य माणसाचे जीवन जगायचे असे त्याने ठरवले. मात्र त्याच्यासोबत चोरी करणाऱ्यांना सरफराजचा हा निर्णय रुचला नाही.

11 फेब्रुवारीला सायंकाळी चारच्या सुमारास अन्वर मियां शेख याने सरफराज रेल्वेमध्ये आणि बसमध्ये पाकिटमारी, चोरी करण्यासाठी का जात नाही आणि चोरी केलेला माल का आणून देत नाही असे विचारले. या चर्चेच रुपांतर वादात झालं. याचाचं राग मनात धरत अन्वर मियां शेखने सरफराजला बेदम मारहाण केली. त्यानंतर अन्वरने धारदार शस्त्राने सरफराजवर हल्ला चढवत त्याची हत्या केली.

सरफराजने चोरी करणे सोडल्याने अन्वरला सरफराजकडून पैसे मिळत नव्हते. धंद्यात खोट निर्माण झाली होती. तर सरफराज आपल्याला न सांगता धंदा करत असल्याचा संशयही अन्वरला होता. सरफराज चोरीच्या धंद्यापासून दूर जात असल्याने अन्वरचं नुकसान होत होतं, म्हणूनच अन्वरने सरफराजची हत्या केल्याचा आरोप सरफराजच्या नातेवाईकांनी केला आहे. खुना  प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी अन्वरला अटक केली आहे, तर सरफराजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास ट्रॉम्बे पोलीस करत आहेत.

Published On - 3:34 pm, Wed, 13 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI