Uddhav Thackeray : मराठवाड्यात पावसाची रझाकारी; सरसकट कर्ज माफी द्या, उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी

Uddhav Thackeray to Fadnavis : पावसाच्या रझाकारीने मराठवाड्यावर मोठे संकट ओढावले आहे. पायाखाली पाणी आणि डोळ्यात पाणी अशी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था आहे. सरकारच्या तुटपुंज्या मदतीवर बोट ठेवत उद्धव ठाकरे यांनी मोठी मागणी केली आहे.

Uddhav Thackeray : मराठवाड्यात पावसाची रझाकारी; सरसकट कर्ज माफी द्या, उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
उद्धव ठाकरे
| Updated on: Sep 27, 2025 | 1:45 PM

मराठवाड्यात पावसाची रझाकारी दिसून आली. गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार पाच दिवसात तर अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. झाडून सर्व मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी डोळ्यांनी हे नुकसान पाहिले. पण मदत करताना निकषाचा डोंगर उभा ठाकला आहे. तुटपूंज्या मदतीविरोधात शेतकरी संतापला आहे. तर काल मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी सरकारला कानपिचक्या सुद्धा दिल्या.

सरकारची मदत तुटपूंजी

मराठवाड्यात आकाश फाटलं आहे. अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं झाले. पीक उद्धवस्त झालं. पीकं सडलेली होती. शेतात पाणी होतं. शेतकरी धायमोकलून रडत होते. शेतकरी आपुलकीने माझ्याशी बोलले, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकारने आता जी मदत देऊ केली आहे. ती अगदीच तुटपूंजी आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. खूप मोठं नुकसान झालं आहे. दोन-तीन वर्ष त्यांना या संकटातून बाहेर पडायला लागेल. विद्यार्थ्यांचे वह्या पुस्तकं वाहून गेली आहे. हे मोठं नुकसान आहे. त्यामुळे सरकारने आता निकष न लावता सरसकट मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आम्ही पंचाग काढून नाही बसलो

शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी करणे जर राजकारण असेल तर हो ते राजकारण आहे. शेतकऱ्यांने कर्जमाफी कधी देणार असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारल्यावर, मुख्यमंत्री त्याला म्हणत आहेत की राजकारण करू नका. त्याच्या मागे पोलीस लावले जात आहे. मग राजकारण कोण करतंय, असे विचारत आम्ही पंचाग काढून नाही बसलो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

सरसकट कर्ज मुक्त करा

आतापर्यंत जाहीर झालेली 14 हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. 2017 मध्ये जी कर्जमाफीची घोषणा झाली, त्याची अंमलबजावणी झाली नाही असा आरोप उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत केला. पंजाब राज्य सरकारने जशी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर केली. तशी मदत महाराष्ट्र सरकारने जाहीर करावी असी मागणी त्यांनी केली. तर हे नुकसान येत्या 2 ते 3 वर्षांत भरून निघणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त करा अशी मागणी त्यांनी केली.